पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नेपाळमध्ये होत असलेल्या सार्क परिषदेच्या व्यासपीठावर दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सार्क देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्याचवेळी चांगला शेजारी असणे ही आंतरराष्ट्रीय राजकारणाची गरज असल्याचे सांगत, पाकिस्तानला अप्रत्यक्ष टोला हाणला. मुंबईवरील २६११च्या दहशतवादी हल्ल्यास आज सहा वर्ष पूर्ण होत असल्यामुळे सार्क परिषदेत मोदी काय बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. गेल्या काही दिवसांपासून भारत-पाक संबंधांमध्ये असणारा तणाव या परिषदेतही अनुभवण्यास मिळाला. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीला अन्य सार्क देशांच्या प्रतिनिधींचा उल्लेख केला. मात्र, त्याचवेळी भारताचा शेजारी असणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा नामोल्लेख मोदींनी टाळला. नरेंद्र मोदींचे हे पाऊल भारतातील दहशतवादी कारवायांशी संबंधित असणाऱ्या पाकिस्तानसाठी कठोर इशारा असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, सार्क देशांच्या समस्या आणि विकासासाठीच्या उपायांवर मोदींनी यावेळी भाष्य केले. सार्क देशांमध्ये आपापसातील सहकार्य, व्यापार आणि दळणवळण वाढण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे.

* दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सार्क देशांनी एकत्र येण्याची गरज
* दक्षिण आशियाई विद्यापीठाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे.
* सार्क देशांनी पर्यटनाला प्रोत्साहन दिले पाहिजे.
* भारतीय गुंतवणुकदारांच्या माध्यमातून सार्क देशांनी स्वकीय तरूणांसाठी रोजगाराची निर्मिती करावी
* सार्क देशांनी उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील अंतर मिटवण्यावर भर दिला पाहिजे.
* भारतामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर माझा भर राहील.
* पायाभूत सुविधा ही सार्क देशांपुढील महत्वपूर्ण समस्या आहे.
* आपल्याला भुतकाळ मागे सारून पुढे जायला हवे
* सार्क देश एकसारख्याच समस्यांचा सामना करत आहेत.