नेपाळमधील भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दहा हजारांवर जाण्याची शक्यता असल्याचे नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी मंगळवारी ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्याचवेळी मदतकार्याचा वेग आणखी वाढविण्याची अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी परदेशातून तंबू आणि औषधांची मागणी केली आहे.
भूकंपामुळे ढिगाऱयाखाली अडकून पडलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. नेपाळसाठी हा अत्यंत कठीण आणि परीक्षा पाहणारा काळ असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. गेल्या शनिवारी नेपाळला ७.९ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या धक्क्यामुळे संपूर्ण नेपाळसह उत्तर भारतही हादरला. सरकारी आकडेवारीनुसार नेपाळमध्ये आतापर्यंत ४३४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडे दिवसेंदिवस वाढतोच आहे. हाच आकडा दहा हजारांपर्यंत जाण्याची शक्यता कोईराला यांनी व्यक्त केली. जर हा आकडा दहा हजारांपर्यंत गेला, तर नेपाळच्या इतिहासातील ही सर्वांत भीषण घटना असेल. १९३४ मध्ये नेपाळला बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यात ८५०० नागरिकांचा बळी गेला होता.
नेपाळला भूकंपाचा धक्का बसला, त्यावेळी कोईराला देशामध्ये नव्हते. ही घटना समजल्यावर ते रविवारी काठमांडूला परतले. त्यानंतर त्यांनी मदतकार्याचा वेग वाढविण्याचे आणि समन्वय ठेवण्याचे आदेश सरकारी अधिकाऱयांना दिले. ते मंगळवारीच देशवासियांशी संवादही साधणार आहेत. भूकंपामुळे अनेक घरांची पडझड झाल्यामुळे हजारो लोक रस्त्यावर निवाऱयाला आहेत. त्यातच सारखा पाऊस पडत असल्यामुळे लोकांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी परदेशातील सरकारकडून तंबू आणि औषधांची मागणी केली आहे.