‘क्वेकरेली सायमंड्स'(क्यूएस) या जागतिक विद्यापीठ क्रमवारीने मंगळवारी जाहीर केलेल्या प्रतिष्ठीत विद्यापीठांच्या यादीत पहिल्या दोनशे विद्यापीठांमध्ये भारताच्या एकाही विद्यापीठाला स्थान मिळविता आलेले नाही.
जागतिक स्तरावर जाहीर करण्यात आलेल्या प्रतिष्ठीत ‘आयआयटी’ शिक्षण संस्थांच्या या क्रमवार यादीत अमेरिकेच्या ‘मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'(एमआयटी) विद्यापीठाने सलग तिसऱयांदा अव्वल स्थान पटकावले आहे. तर, भारताच्या ‘आयआयटी-मुंबई’ला २२२ व्या आणि ‘आयआयटी-दिल्ली’ला २३५ व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. तसेच ‘आयआयटी-कानपूर’ला ३०० वे तर, ‘आयआयटी-मद्रास’ला ३२२ वे स्थान प्राप्त झाले आहे. या यादीत भारतातील शिक्षण संस्थांच्या सहभागात यंदा एका विद्यापीठाची वाढ झाली असून हा आकडा १२ झाला असला तरी, एकाही विद्यापीठाला २००च्या आत स्थान मिळविता आलेले नाही.
या यादीत जगातील एकूण ३१ देशांचा समावेश असून अमेरिकेच्या सर्वात जास्त ५१ विद्यापीठांचा समावेश पहिल्या २०० मध्ये करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ ब्रिटन(२९), जर्मनी(१३), नेदरलँड(११), कॅनडा(१०), जपान(१०) आणि ऑस्ट्रेलियाच्या(१०) विद्यापीठांचा समावेश आहे.