सीमेलगत भारताने अत्यंत चढाईखोर आणि आक्रमक धोरण अवलंबून शस्त्रसंधीचा भंग केल्याचा कांगावा करून पाकिस्तानच्या नॅशनल अ‍ॅसेम्ब्लीत गुरुवारी भारताच्या ‘अतिक्रमणाचा’ एकमुखी निषेध करण्यात आला. काश्मीर तंटय़ाचे निराकरण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हस्तक्षेप करण्यासंबंधी सरकारने पावले उचलावीत, असेही ठरावान्वये स्पष्ट करण्यात आले.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताझ अझीझ यांनी अ‍ॅसेम्ब्लीत हा ठराव सादर केला. आंतरराष्ट्रीय सीमा तसेच नियंत्रण रेषेनजीक भारताने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून त्यामुळे जीवित व वित्तहानी झाली आहे. भारताच्या या कृत्याचा अ‍ॅसेम्ब्ली निषेध करीत असल्याचे ठरावामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. १३ सप्टेंबरपासून झालेल्या गोळीबारात पाकिस्तानच्या १३ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचाही आरोप या ठरावाद्वारे करण्यात आला आहे.
सरकारने भारतासमवेत द्विपक्षीय चर्चा सुरू ठेवण्याबरोबरच हा मुद्दा आंतरराष्ट्रीय समुदायाशिवाय संयुक्त राष्ट्रांमध्येही उपस्थित करावा आणि काश्मिरी जनतेची इच्छा लक्षात घेऊन त्यांना या प्रश्नी मध्यस्थाची भूमिका बजावण्याची विनंती सरकारने करावी, असे स्पष्ट करण्यात आले.
संरक्षणंमंत्र्यांचा भारताला ‘इशारा’
दरम्यान, कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमणाला तोंड देण्यास पाकिस्तानी लष्कर पुरेसे सक्षम आहे, असे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी अप्रत्यक्षपणे भारताला बजावले. पाकिस्तानच्या अंतर्गत बाबींचा आपल्याला फायदा होईल, असे भारताला वाटत असेल तर चूक करीत आहेत, असेही आसिफ यांनी स्पष्ट केले. शांततेसाठी आम्ही पुढाकार घेतला म्हणजे आम्ही दुर्बळ आहोत, असे भारताने कदापि समजू नये, आम्ही त्यांना परिणामकारक उत्तर देऊ शकतो, असा ‘इशारा’ देत दोन्ही देश अण्वस्त्रधारी असल्याने त्यांनी कोणत्याही प्रकारचे दुस्साहस करू नये, असाही ‘सल्ला’ आसिफ यांनी दिला.