टेनिसपटू सानिया मिर्झा हिची तेलंगणा राज्याची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्याचा तेथील राज्य सरकारचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. भारतीय जनता पक्षाचे तेलंगणातील नेते के. लक्ष्मण यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला असून, पाकिस्तानच्या सुनेला भारतात हा सन्मान देण्याची काय गरज आहे, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.
पत्रकारांशी बोलताना के. लक्ष्मण म्हणाले, सानियाचा जन्म महाराष्ट्रात आणि ती हैदराबादमध्ये मोठी झाली. त्यामुळे ती स्थानिक नक्कीच नाही. त्याचबरोबर तिने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्याशी विवाह केल्यामुळे ती पाकिस्तानची सून झाली आहे. या टेनिसपटूने वेगळ्या तेलंगणासाठीच्या आंदोलनात कधीही सहभाग घेतला नव्हता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. लक्ष्मण हे तेलंगणातील भाजपच्या विधीमंडळ पक्षाचे नेते आहेत.
हैदराबादमधील महापालिका निवडणुकीत मुस्लिम मते आपल्या पारड्यात पडावीत, एवढाच संकुचित दृष्टिकोन ठेवून राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचा आरोपही लक्ष्मण यांनी केला. दरम्यान, तेलंगणा राष्ट्र समितीच्या खासदारांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.