जम्मू-काश्मीरच्या पूरग्रस्तांसाठी पंतप्रधान निधीतून ७४५ कोटी रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे जाहीर केली. त्यापैकी ५७० कोटी रुपये घरांच्या पुनर्वसनासाठी व १७५ कोटी रुपये राज्यभरातील सहा रुग्णालयांच्या नूतनीकरणासाठी खर्च करण्यात येतील, असे मोदी यांनी सांगितले. रुग्णालयांच्या नूतनीकरणाबरोबरच तेथे नवीन यंत्रणा तसेच अन्य सामग्री तातडीने आणण्यासाठीही मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदी यांनी काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासमवेत राज्याच्या पूरस्थितीबद्दल चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ठिकठिकाणी आलेल्या पुरामुळे आपली घरे उद््ध्वस्त झाल्याचे अनेक लोकांनी आपल्याला सांगितले. या लोकांच्या घरांचे पुनर्वसन करण्यासाठी लागणारा निधी त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यासंबंधी आपण गांभीर्याने विचार करीत असल्याचे सूतोवाच पंतप्रधानांनी केले.
प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके आणि वह्य़ा बदलून देण्याचाही निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे, असे केंद्रीय गृह सचिव अनिल गोस्वामी यांनी पत्रकारांना सांगितले.पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ४४ हजार कोटी रुपयांची मदत देण्यासंबंधी राज्य सरकारने निवेदन दिले आहे. त्याच्याशी पंतप्रधानांच्या गुरुवारच्या घोषणेचा संबंध नसल्याचे स्पष्टीकरण गोस्वामी यांनी दिले. सरकारच्या निवेदनावर विस्तृत अभ्यास केल्यानंतर योग्य तो मदतनिधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही ते म्हणाले.
मोदी यांची जवानांसोबत दिवाळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सियाचेनच्या बर्फाच्छादित शिखरांवर जवानांसोबत दिवाळी साजरी करत त्यांचे मनोधैर्य वाढवले. तुम्ही मातृभूमीची सेवा करत आहात, देशाचा प्रत्येक नागरिक तुमच्या पाठीशी आहे असा संदेश मोदींनी यावेळी दिला. सियाचेनमधूनच पंतप्रधानांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.