अमेरिकेचे आभार व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा पाच दिवसांचा अमेरिका दौरा संपवला. आपला दौरा यशस्वी व समाधानकारक झाला असे मोदी यांनी सांगितले. दरम्यान या दौऱ्यात मोदी यांनी अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी जवळिकीचे संबंध प्रस्थापित करीत द्विपक्षीय संबंधात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. अजूनही काही प्रश्नांवर समाधानकारक तोडगा निघणे बाकी आहे.
दोन्ही देशांच्या नेत्यांनी चर्चेच्या दोन फेऱ्यानंतर संयुक्त निवेदन जारी केले असून त्यात दोन्ही देशांत विस्तारित सामरिक व जागतिक  भागीदारी करण्यावर भर देण्यात आला. दोन्ही देशातील सहकार्य अधिक मजबूत करण्याचे ठरवण्यात आले. मोदी यांनी त्यांच्या ऊर्जात्मक व्यक्तिमत्त्वाने सर्वावर छाप पाडली व भारताचा कायापालट करण्याचा त्यांचा निर्धार सर्वाना भावला. रेल्वे, संरक्षण उत्पादन व इतर क्षेत्रांत त्यांनी अमेरिकेच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. अमेरिकेतील बडय़ा कंपन्यांनी फार उशीर होण्यापूर्वी भारतात विस्तार करावा, असे मोदी यांनी अमेरिका-भारत व्यापार मंडळापुढे बोलताना सांगितले. भारतात उद्योग सुरू करणे सुरळीत व्हावे यासाठी सर्व गोष्टींची अंमलबजावणी पंतप्रधान मोदी येत्या सहा महिन्यांत करणार आहेत. येत्या तीन वर्षांत भारतात ४१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन अमेरिका-भारत व्यापार मंडळाने त्यांना दिले आहे. अमेरिकी प्रसारमाध्यमांच्या विश्लेषणानुसार भारतीय कर कायदे, व्यापार व नागरी अणुकरार सहकार्य यात अजूनही काही विवादास्पद मुद्दे आहेत.
‘दाऊदला पकडू’
दाऊद हा १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांचा सूत्रधार होता आणि तो पाकिस्तानातच असल्याचा भारताचा संशय आहे, त्याला पकडून ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेची मदत घेतली जाणार आहे. मोदी आणि ओबामा यांच्या चर्चेनंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारत आशियातील दहशतवाद विरोधी मित्र देशांच्या आघाडीत सामील होणार नाही.