येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या ‘सार्क’ परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंगळवारी येथे आगमन झाले. ‘शेजारी राष्ट्रांसमवेत निकटचे संबंध प्रस्थापित करण्यास आपल्या सरकारने मुख्यत्वे प्राधान्य दिले आहे,’ असे मोदी यांनी नमूद केले.
सार्क परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी हे दक्षिण आशियाई राष्ट्रप्रमुखांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासमवेत बैठक होण्याचे त्यांच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेमध्ये नमूद करण्यात आलेले नसले, तरी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्र राजपक्षे यांच्यासह अन्य नेत्यांसमवेत मोदी यांची चर्चा होण्याची शक्यता आहे. शेजारी राष्ट्रांसमवेत निकटचे संबंध प्रस्थापित करण्यावर भर देतानाच दक्षिण आशियाई राष्ट्रप्रमुखांशी चर्चा करण्याचाही मानस पंतप्रधानांनी व्यक्त केला.

‘चर्चेचा निर्णय भारतानेच घ्यावा’
काठमांडू :सार्क परिषदेच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्या पंतप्रधानांची चर्चा होण्याचे संकेत मिळत असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी चर्चेचा चेंडू भारताच्या कोर्टात ढकलला आहे. ‘आमच्याशी चर्चा रद्द करण्याचा एकतर्फी निर्णय तेव्हा भारताने घेतला होता. आता ही चर्चा सुरू करायची की नाही, हे भारतानेच ठरवायचे आहे’ असे शरीफ यांनी येथे सांगितले. उभय देशांची चर्चा सुरू होणार काय, असा प्रश्न विचारला असता, हा प्रश्न तुम्ही भारताच्या पंतप्रधानांना विचारला पाहिजे कारण परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा भारतानेच रद्द केली होती, असे शरीफ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि पाकचे परराष्ट्र सल्लागार सरताझ अझीझ यांच्यात झालेली सदिच्छा भेट म्हणजे अधिकृत चर्चा असा लावू नये, असे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी येथे स्पष्ट केले. अर्थपूर्ण संवादाची भारतालाही इच्छा असल्याचे ते म्हणाले.

भारताच्या ५००, १००० रुपयांच्या नोटा वटणार
काठमांडू : ५०० रुपये आणि १००० रुपयांच्या भारतीय नोटा नेपाळमध्ये वटण्यासाठीचा मार्ग खुला करण्यात आला आहे. भारत व नेपाळने मंगळवारी या संदर्भात करार केला. मात्र रुपये वटण्यासाठी २५००० रुपयांची कमला मर्यादाही ठेवली आहे.  भारतातील बहुसंख्य पर्यटक नेपाळमध्ये जात असल्याने ही बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतातील १०० रुपयांच्या वरील नोटांना नेपाळमध्ये बंदी आहे.  
 
काठमांडू-दिल्ली बससेवेला प्रारंभ
नेपाळ व भारत या दोन्ही देशांतील पर्यटकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या काठमांडू-दिल्ली पशुपतिनाथ एक्स्प्रेसला मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी हिरवा झेंडा दाखविला. उभय देशांतील व्यापार आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी ही बससेवा प्रभावी ठरेल आणि या देशांमधील संबंध उंचाविण्यास त्यामुळे मदत होईल, असा दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. ही बस काठमांडू, भरावा, सानौली, गोरखपूर, लखनऊ आणि नवी दिल्ली या शहरांतून धावणार आहे

काठमांडू : दहशतवाद हे उपखंडासमोरील सर्वात मोठे आव्हान असून या आव्हानास तोंड देण्यासाठी ‘सार्क’ सदस्य राष्ट्रांनी संस्कृती, व्यापार तसेच संपर्कयंत्रणा या तीन संकल्पनांच्या आधारे सामूहिकरित्या व्यापक प्रयत्न करावेत, असे आवाहन भारताने मंगळवारी येथे केले. ‘सार्क’ सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी उपरोक्त आवाहन केले.