गेले अनेक दिवस अज्ञातवासात गेलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी लवकरच परत येतील आणि मे महिन्यापर्यंत त्यांचे काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी नामांकन होण्याची शक्यता असल्याचे संकेत पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिले आहेत.
राहुल लवकरच परत येतील आणि त्यानंतर पक्षाच्या अध्यक्ष निवडीला वेग येईल. मे महिन्यात दिल्ली, उत्तराखंड किंवा हिमाचल प्रदेश येथे काँग्रेसच्या कार्यसमिती आणि अखिल भारतीय समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यात राहुल यांचे पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी नामांकन होऊ शकेल, असे भाकीत अनेक वरिष्ठ नेत्यांनी केले. राहुल यांच्या प्रदीर्घ सुटीमुळे काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत सध्या संभ्रमावस्था आहे. तसेच त्यांच्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र २६ मार्चला काँग्रेसने आपला पक्षांतर्गत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार ३० सप्टेंबरअखेर अध्यक्षपदाची निवडणूक झालेली असेल. मात्र राहुल जितक्या लवकर परततील आणि निर्णय घेतील तेवढे पक्षासाठी चांगले होईल, असे मत पक्षातील सूत्रांनी व्यक्त केले.