नेपाळ भूकंपाच्या विध्वंसात अनाथ झालेल्या चिमुकल्यांच्या मदतीसाठी योगगुरू रामदेवबाबा यांनी पुढाकार घेतला आहे. भूकंपाच्या प्रलयात आपल्या पालकांना गमावून बसलेल्या जवळपास ५०० मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय रामदेवबाबांनी घेतला आहे. नेपाळमध्ये पतंजलीच्या योगपीठात या अनाथ चिमुकल्यांच्या राहण्याची सोय करण्यात येणार आहे. तसेच या मुलांच्या इयत्ता पाचवी पर्यंतच्या शिक्षणाचा सर्व खर्च रामदेबाबा करणार आहेत.
योगगुरू रामदेवबाबांनी नेपाळमधील ५०० मुलांना दत्तक घेणार असल्याचे सांगितले असून पतंजली योगपीठ ट्रस्टतर्फे मुलांची राहण्याची, खाण्याची आणि इयत्ता पाचवीपर्यंतच्या मोफत शिक्षणाची सोय रामदेवबाबा करणार आहेत, अशी माहिती रामदेवबाबा यांच्या कार्यालयातील प्रवक्त्याने दिली.
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये शनिवारी झालेल्या भीषण भूकंपातून रामदेवबाबा बचावले होते. त्यानंतर त्यांनी तेथे मदतकार्यही केले. अखेर दोन दिवसांनंतर सोमवारी रामदेवबाबा दिल्लीहून हरिद्वारमध्ये पोहचले. रामदेवबाबा आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पण, त्यांचा सहकारी आचार्य बाळकृष्ण सध्या नेपाळमध्येच  मदतकार्यात व्यस्त आहे.