गांधी जयंतीनिमित्त दरवर्षी होणाऱ्या सरकारी कार्यक्रमांमध्ये भाषणबाजी करणारे केंद्रीय मंत्री यंदा रस्त्यावर साफसफाई करताना दिसणार आहेत.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा प्रारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची घोषणा केली होती. गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला सर्व मंत्रालये, सरकारी आस्थापनांमध्ये मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयात स्वच्छता केली. दुपारनंतर सर्व कार्यालये बंद करून कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले. अर्थात २ ऑक्टोबरची सुट्टी सरकारी बाबूंना उपभोगता येणार नाही. गांधी जयंतीच्या दिवशी सकाळी दहा वाजता कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वच्छता अभियान व कार्यक्रम उरकल्यानंतर सुट्टी देण्यात येणार आहे.
केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी मंत्रालयाची झाडाझडती घेतली. काही विभागांमध्ये अस्वच्छता होती. काही ठिकाणी वायरी बाहेर डोकावत होत्या. स्वच्छतागृहांची अवस्था वाईट होती. त्यावरून पासवान यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. वाचनालयात कागद विखुरलेले होते. पासवान यांनी स्वत: हे कागद उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकले. केंद्र व दिल्ली राज्य सरकारच्या कार्यालयांमध्ये थोडय़ाफार फरकाने हीच स्थिती होती. वरिष्ठ अधिकारी स्वत: या अभियानात सहभागी झाले आहेत. या अभियानाच्या निमित्ताने देशभरातील ३१ लाख केंद्रीय कर्मचारी स्वच्छतेची शपथ घेणार आहेत. यास ‘स्वच्छ शपथ’ असे नाव देण्यात आले आहे. कॅबिनेट सचिव अजित सेठ यांनी यासंबंधीचे निर्देश प्रत्येक विभागास दिले आहेत. २०१९ हे गांधीजींचे १५० वे जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने गांधीजींना ‘स्वच्छ भारत’ देऊ, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. त्यास उद्योग जगत, स्वयंसेवी संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
केजरीवाल यांचाच कित्ता
दिल्लीत बहुसंख्य असलेल्या वाल्मीकी समुदायाचे आराध्य असलेल्या वाल्मीकी मंदिरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘स्वच्छ भारत’ अभियानाची सुरुवात करणार आहेत. गतवर्षी दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात आम आदमी पक्षाने याच मंदिरापासून केली होती. आपची निशाणी असलेला झाडू हातात घेऊन अभियान सुरू करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसचा दारुण पराभव केला होता. वाल्मीकी समाज व स्वच्छतेशी असलेल्या संबंधांचे राजकारण समोर ठेवून पंतप्रधान मोदी गांधी जयंती दिनी या अभियानाची सुरुवात करणार आहेत.