बलुचिस्तान प्रांतात रस्त्यावर करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यात पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन यांचा पुत्र सलमान ममनून थोडक्यात बचावला. मात्र या हल्ल्यात अन्य तीन जण ठार झाले.
सलमान ममनून याच्या गाडीचा ताफा हब औद्योगिक परिसरातील रस्त्यावरून जात असताना रिमोटच्या सहाय्याने बॉम्ब उडविण्यात आला, मात्र सुदैवाने सलमान बचावला. एका रेस्टॉरण्टबाहेर हा बॉम्बहल्ला करण्यात आला त्याच वेळी सलमान ममनून यांची गाडी तेथून जात होती. हल्लेखोरांचे मुख्य लक्ष्य सलमान ममनून होता, मात्र सुदैवाने तो बचावला. या वेळी तेथून जाणारे अन्य तीन जण ठार झाले त्यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे.
हल्लेखोरांनी या मार्गावर उभ्या केलेल्या एका दुचाकीत स्फोटके दडवून ठेवली होती. सलमान ममनून त्याच मार्गावरून जातो हे हल्लेखोरांना माहिती होते. सलमान यांच्या गाडय़ांचा ताफा आणि पोलीस अधिकारी तेथून जात असताना स्फोट झाला.
या हल्ल्यात सलमान बचावले असले तरी तीन जण ठार झाले असून चार पोलिसांसह १३ जण जखमी झाले आहेत.