काल रात्री येथे भरधाव आलेल्या पॅसेंजर रेल्वेने सिग्नल तोडून दुसऱ्या रेल्वेला धडक दिल्याने झालेल्या अपघातात १४ जण ठार, तर ४५ जण जखमी झाले आहेत. मधुदीह-लखनौ कृषक एक्सप्रेस या गाडीने लखनौहून बरोनीकडे जाणाऱ्या दुसऱ्या एक्सप्रेस गाडीला बाजूने धडक दिली, त्या वेळी ही गाडी नंदनगर रेल्वे फाटकाजवळून लूप लाइनवर वळत होती. रात्री अकरा वाजता हा अपघात गोरखपूरपासून सात कि.मी. अंतरावर झाला, असे उत्तर-पूर्व रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी आलोककुमार सिंग यांनी सांगितले.
 बरौनी एक्स्प्रेसच्या तीन डब्यांचे खूप नुकसान झाले. अपघातात १२ प्रवासी मरण पावले. कृषक एक्सप्रेसचा चालक राम बहादूर व सहायक चालक सत्यजित यांना सिग्नल तोडल्याने निलंबित करण्यात आले आहे. सकृतदर्शनी कृषक एक्सप्रेसने थांबणे गरजेचे होते पण या गाडीने सिग्नल तोडला. ही गाडी लखनौला जात होती. तर बरौनी एक्सप्रेस लखनौहून येत होती. ४५ प्रवासी यात जखमी झाले त्यात १२ जणांची प्रकृती गंभीर आहे. रेल्वेने या घटनेची चौकशी रेल्वे सुरक्षा आयुक्त पी.के.बाजपेयी यांच्याकडे दिली असून त्यांना अपघाताचे कारण निश्चित करण्यास सांगितले आहे, असे प्रवक्ते अनिल सक्सेना यांनी सांगितले.