दक्षिण गुजरातमध्ये विश्व हिंदू परिषदेने ‘घरवापसी’ कार्यक्रमात शंभर आदिवासी ख्रिश्चनांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले. विहिंपने मात्र ९०० जणांनी धर्मातर केल्याचा दावा केला आहे. वलसाड जिल्ह्य़ातील कपर्डा तालुक्यात आर्णीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हे आपल्या घरात पुन्हा परतले आहेत, अशी घोषणा या कार्यक्रमात धार्मिक विधी केलेल्या प्रफुल्ल शुक्ला यांनी केली. हिंदुस्थान हा हिंदूंचाच देश राहील अशी घोषणा शुक्ला यांनी या वेळी केली. दोन वर्षांपूर्वीच या आदिवासींनी हिंदू धर्मात प्रवेश केला होता हा औपचारिक कार्यक्रम होता असे त्यांनी स्पष्ट केले.
माझा भाऊ आजारी पडल्यानंतर उपचारासाठी गेल्यानंतर मी ख्रिश्चन झाले होते असे धर्मातर केलेल्या रोनकाबाई सोमाबाई कडट यांनी स्पष्ट केले. माझा भाऊ व त्याची मुले आजही ख्रिश्चन आहेत, मात्र मी हिंदू धर्मात परतण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी स्पष्ट करून धर्मातरासाठी माझ्यावर कुणीही सक्ती केली नाही, असे सांगितले.
कोणतेही आमिष न दाखवता हे सर्व जण हिंदू धर्मात परतले आहेत, असे विहिंपचे गुजरात प्रमुख कौशिक मेहता यांनी स्पष्ट केले. १७० कुटुंबांनी ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केल्याचा दावा विहिंपच्या गुजरात धर्मप्रसार विभागाचे प्रमुख धर्मेद्र भवानी यांनी केला आहे.
केरळमध्येही कार्यक्रम
अलप्पुळा : विश्व हिंदू परिषदेने रविवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केरळमधील अलप्पुळा जिल्ह्य़ातील अनुसूचित जातीतील ख्रिश्चनांच्या ८ कुटुंबांतील तीस जणांना हिंदू धर्मात परत घेण्यात आले. विहिंपच्या जिल्हा शाखेने घेतलेला हा ‘घरवापसी’चा कार्यक्रम कनिचनालोर येथील एका मंदिरात पार पडला.