आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी दिल्ली न्यायालयाने भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत, मुंबईचा फिरकी गोलंदाज अंकित चव्हाण यांना दोषमुक्त केले असले तरी त्यांच्यावरील बंदी उठवण्याचा आमचा कोणताही इरादा नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले आहे.
पतियाळा हाऊस न्यायालयाने शनिवारी दिलेल्या निर्णयानुसार श्रीशांत, चव्हाण आणि अजित चंडिला यांच्यासह ३६ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र बीसीसीआयने त्यांच्यावरील बंदी उठवण्यास मात्र नकार दिला आहे.
श्रीशांतने पुन्हा खेळू द्यावे, अशी विनंती करणारे पत्र केरळ क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयला सादर केले आहे. दोन खेळाडूंवरील आजीवन बंदीबाबत पुनर्विचार होणार नाही, असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.
‘‘शिस्तभंगाची चौकशी आणि गुन्हेगारी चौकशी यात फरक असतो. या खेळाडूंनी शिस्तीचा भंग केल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंध विभागाने आमच्याकडे सादर केला आहे. त्यानुसार ही कारवाई आम्ही केली होती. त्यामुळेच बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने या खेळाडूंवर घातलेली बंदीची शिक्षा कायम राहणार आहे,’’ असे ठाकूर यांनी सांगितले.