कबड्डी खेळाला नवा आयाम देणाऱ्या प्रो-कबड्डी स्पर्धेचा ताफा पूर्वेच्या दिशेने रवाना झाला. घरच्या मैदानावर यु मुंबा संघाने दमदार कामगिरी केली होती. मात्र बंगाल टायगर्स संघाला घरचे मैदान आणि प्रेक्षकांचा पाठिंबा मानवला नाही. बंगळुरू बुल्स संघाने बंगाल टायगर्सवर ४६-३० अशी मात केली. बंगळुरूच्या विजयात अजय ठाकूर चमकला. त्याने १७ चढायांमध्ये १० गुण मिळवत या विजयात निर्णायक भूमिका बजावली. राजेश मंडलने ५ गुण कमावत अजयला चांगली साथ दिली.
बुधवारी प्रो-कबड्डी लीगमध्ये प्रथमच कोरियाच्या जंग कुन ली आणि श्रीलंकेच्या सिनोथ्रान केनशारजा या भारताबाहेरील खेळाडूंना प्रत्यक्ष मैदानावर खेळायची संधी मिळाली. अतिशय वेगवान चढाया करणाऱ्या लीने पाच गुण कमवत आपला प्रभाव दाखवला. नितीन मदनेने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करताना चढायऋंचे चार गुण मिळवले, तर चार महत्त्वाच्या पकडीही केल्या. या विजयासह बंगळुरूचे १५ गुण झाले असून, ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. तर यु मुंबा संघ १८ गुणांसह आघाडीवर आहे.
सामन्यातील सवरेत्कृष्ट चढाईपटूचा मान अजय ठाकूरने पटकावला तर सवरेत्कृष्ट बचावपटू म्हणून धर्मराज चेरालाथनची निवड झाली. मुंबई येथे झालेल्या सामन्यात यजमान यु मुंबईकडून पराभव झाल्याने बंगाल टायगर्स संघ घरच्या मैदानावर चांगली सुरुवात करण्यासाठी उत्सुक. त्यासाठी उत्साही प्रेक्षकांचा पाठिंबाही त्यांना लाभला, मात्र बंगळुरू बुल्सच्या वर्चस्वापुढे ते निष्प्रभ ठरले. पहिल्या सत्रात बंगालचा संघ १३-२५ असा पिछाडीवर होता. ली आणि मदने यांनी पिछाडी भरून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र बंगळुरूच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण खेळ करत आगेकूच केली. बंगाल टायगर्सचा पुढचा मुकाबला दबंग दिल्लीशी होणार आहे आणि जयपूर पिंक पँथर्स समोर तेलुगू टायटन्सचे आव्हान आहे.