अठराव्या विक्रमी ग्रँडस्लॅमच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रॉजर फेडररने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. फ्रेंच खुल्या स्पर्धेत अनपेक्षित पराभवाला सामोरे गेलेल्या राफेल नदालने विम्बल्डन मोहिमेची विजयाची सुरुवात केली. महिलांमध्ये इग्युेनी बुचार्ड आणि सिमोन हालेप या दोघांनी सलामीच्या लढतीतूूनच गाशा गुंडाळावा लागला.
विम्बल्डनसाठी सर्वतोपरी तयारी झाली आहे असे विधान फेडररने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. सर्वागीण खेळ करत फेडररने सूर गवसल्याचे सलामीच्या विजयासह सिद्ध केले. त्याने दामिर झुमूरचा ६-१, ६-३, ६-३ असा पराभव केला. गेल्या अडीच वर्षांत फेडररला ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावता आलेले नाही. यंदाच्या वर्षांतल्या ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच खुल्या स्पर्धेतही उपांत्यपूर्व फेरीतच त्याला गाशा गुंडाळावा लागला होता. विम्बल्डन अर्थात आवडत्या ग्रास कोर्टवर फेडररने दिमाखात सुरुवात केली आहे.
२००९ नंतर पहिल्यांदाच नदालला फ्रेंच खुल्या स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले. या अनपेक्षित पराभवातून सावरत नदालने विम्बल्डन स्पर्धेत आश्वासक सुरुवात केली. नदालने थॉमझ बेलुसीवर ६-४, ६-२, ६-४ असा विजय मिळवला. जो विलफ्रेड सोंगाने पाच सेटच्या मॅरेथॉन मुकाबल्यात गाइल्स म्युलरवर  ७-६, ६-७, ६-४, ३-६, ६-२ अशी मात केली.
घरच्या मैदानावर, चाहत्यांचा प्रचंड पाठिंब्यात खेळणाऱ्या अँडी मरेने कुकुश्किनवर ६-४, ७-६, ६-४ असा विजय मिळवला. सलामीच्या लढतीतच मरेला विजयासाठी संघर्ष करावा लागला.
गेल्यावर्षी अंतिम फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या बुचार्डला पहिल्याच लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत ११७व्या स्थानी असलेल्या चीनच्या डय़ुआन यिंग यिंगने १२व्या मानांकित बुचार्डवर ७-६ (७-३), ६-४ अशी मात केली. जाना सेपलोव्हाने तृतीय मानांकित सिमोन हालेपवर ५-७, ६-४, ६-३ असा विजय मिळवला. गतविजेत्या आणि द्वितीय मानांकित पेट्रा क्विटोव्हाने केवळ ३५ मिनिटांत नेदरलँड्सच्या किकी बर्टन्सचा धुव्वा उडवला. पेट्राने हा सामना ६-१, ६-० असा जिंकला. पेट्राने संपूर्ण सामन्यात केवळ एक गुण गमावला. दुसऱ्या सामन्यात तिची लढत जपानच्या कुरुमी नाराशी होणार आहे.
जर्मनीच्या अँजेलिक्यू कर्बरने कॅरिना विथोफ्टचे आव्हान ६-०, ६-० असे संपुष्टात आणले. पहिल्या दिवशी व्हीनस विल्यम्स आणि आंद्रेआ पेटकोव्हिक यांनी प्रतिस्पध्र्याना एकही गुण जिंकू न देता विजय मिळवला होता. कर्बरने या पंक्तीत स्थान मिळवले.