भरघोस पदकांची अपेक्षा धरणाऱ्या भारतीय संघाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकांच्या अभियानाला गुरुवारपासून खऱ्या अर्थाने प्रारंभ होत आहे. वेटलिफ्टिंगमध्ये ओंकार ओतारी व संजिता चानू तर ज्युदोमध्ये जिनादेवी चोंघाम यांच्याकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. स्क्वॉश, सायकलिंग, महिला हॉकी आणि बॅडमिंटनमध्ये भारतीय संघ चांगली सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला भरपूर पदकांची कमाई करण्याची संधी असते. त्यामुळेच ग्लासगो येथे पदकांची लयलूट करण्यासाठी भारतीय खेळाडू आशावादी आहेत. स्क्वॉशमध्ये दीपिका पल्लिकल व सौरव घोषाल हे स्टार खेळाडू आपले नशीब आजमावणार आहेत. सायकलिंगमध्येही भारतीय खेळाडू यशस्वी प्रारंभ करण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. महिला हॉकीत भारतापुढे कॅनडाचे आव्हान असणार आहे.
*वेटलिफ्टिंगमध्ये पदकांची संधी
वेटलिफ्टिंग हा क्रीडा प्रकार भारतासाठी नेहमीच लाभदायक ठरला आहे. पुरुषांच्या गटात ओंकार ओतारी हा ६९ किलो गटात प्रतिनिधित्व करीत आहे, तर महिलांमध्ये संजिता चानू ही ४८ किलो गटात भाग घेत आहे. या दोन्ही खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे पण त्याचबरोबर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगले यश मिळविले आहे. तीन प्रकारांमध्ये पदके मिळत असल्यामुळे सहा पदकांची संधी भारताला मिळत आहे.
*ज्युदोत मोठे आव्हान
महिलांच्या ज्युदोमध्ये जिना देवी ही ७८ किलो गटात उतरली आहे. तिच्यापुढे प्रामुख्याने आफ्रिकन देशांच्या खेळाडूंचे आव्हान असणार आहे. या स्पर्धेसाठी तिने भरपूर सराव केला आहे. तिने आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावर भरपूर पदके मिळविली आहेत.
*सायकलिंगमध्ये कसोटी
सायकलिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही. त्यामुळेच अॅलन बेबी, अमरित सिंग व अमरजित नेगी यांच्या कामगिरीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ते वैयक्तिक व सांघिक कौशल्य प्रकारात उतरले आहेत.
*स्क्वॉशमध्ये दीपिका व सौरववर भिस्त
जागतिक स्तरावर अनेक स्पर्धामध्ये प्रभावी कामगिरी करणारे दीपिका पल्लिकल व सौरव घोशाल यांच्या कामगिरीबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे. महिला एकेरीत दीपिका हिच्याबरोबरच ज्योत्स्ना चिनप्पा ही अनुभवी खेळाडूही उतरली आहे. पुरुषांच्या एकेरीत सौरवबरोबर महेश माणगांवकर हादेखील आपले नशीब आजमावत आहे. दोन्ही गटांमध्ये प्राथमिक लढतींमध्ये विजय मिळवताना भारतीय खेळाडूंना अडचण येऊ नये अशी अपेक्षा आहे.
*हॉकीमध्ये सोपा पेपर
महिला हॉकीमध्ये भारताला कॅनडाबरोबर खेळावे लागणार असून, हा सामना जिंकणे भारताला कठीण जाणार नाही.  जागतिक क्रमवारीत भारताला १३वे स्थान आहे तर कॅनडा २२व्या क्रमांकावर आहे. मलेशियाबरोबर नुकत्याच झालेल्या मालिकेत भारताने वर्चस्व गाजविले होते. त्याचा फायदा भारताला होईल. रितू राणी व पूनम राणी यांच्यावर भारताची मदार आहे. कॅनडाची मदार प्रामुख्याने केट गिलीस व ख्रिस्ती विशार्ट यांच्यावर आहे.
*बॅडमिंटनबाबत उत्सुकता
आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या अनुपस्थितीत भारतीय संघ राष्ट्रकुलमध्ये उतरला असल्यामुळे अन्य खेळाडूंच्या कामगिरीबाबत कमालीची उत्सुकता आहे. गतवेळी भारताने घरच्या स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य व एका कांस्यपदकाची कमाई केली होती. सांघिक विभागातील लढतींना गुरुवारी प्रारंभ होत आहे. पहिल्या लढतीत भारताची घाना संघाशी गाठ पडणार आहे. ही लढत भारत सहज जिंकेल अशी अपेक्षा आहे. साखळी गटात भारताला त्यानंतर केनिया व युगांडा यांच्याशी खेळावे लागणार आहे. या गटात भारतीय संघ अव्वल स्थान घेत बाद फेरीत सहज प्रवेश करील असा अंदाज आहे.