आय-लीग या भारतातील राष्ट्रीय फुटबॉल लीगचा दर्जा हा युरोपियन राष्ट्रीय लीगपेक्षा दुय्यम दर्जाचा आहे. त्यामुळे इंडियन सुपर लीगमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय युवा फुटबॉलपटूंना घडवण्याचे अग्निदिव्य आम्हाला पार पाडावे लागणार आहे. परदेशात आम्ही जेव्हा इंडियन सुपर लीगविषयी चर्चा करत होतो, त्यावेळी अनेक जणांनी आश्चर्य व्यक्त केले. पण या स्पर्धेबाबतची काही छायाचित्रे आणि घडामोडी आम्ही संकेतस्थळावर टाकल्या, त्यावेळी इंडियन सुपर लीगचे गांभीर्य आमच्या लक्षात आले, असे फिरोन्टिना क्लबचे मुख्य कार्यकारी अधिकारी सँड्रो मेनकुकी यांनी सांगितले.
पुणे सिटी फुटबॉल क्लब या इंडियन सुपर लीगमधील पुणे संघाच्या फ्रँचायझीने बुधवारी इटलीतील ‘सेरी-ए’ स्पर्धेत प्रतिनिधित्व करणाऱ्या फिरोन्टिना या क्लबशी तांत्रिक सहकार्यासाठी करार केला. त्याचबरोबर फ्रान्सच्या १९९८च्या विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू डेव्हिड ट्रेझेगुएट हा पुणे संघाचा ‘आयकॉन’ खेळाडू असल्याची घोषणा केली. गोलरक्षक इमान्युएल बेलार्डी आणि बचावपटू ब्रुनो सिरिल्लो या इटलीच्या दोन खेळाडूंसह प्रशिक्षक फ्रांको कोलोम्बा यांनाही पुणे सिटी फुटबॉल संघात समाविष्ट करून घेण्यात आले.
‘‘आयएसएलच्या नियमांनुसार खेळाडूंना किती रकमेला करारबद्ध करण्यात आले, हे जाहीर करता येणार नाही,’’ असे पुणे संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल यांनी सांगितले.