भारताचा एकेकाळचा आधारस्तंभ असलेल्या अष्टपैलू युवराज सिंग कर्करोगावर मात करून मैदानात उतरून आपली जिद्द दाखवली खरी, पण त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी मात्र करता आली नाही. २०११च्या विश्वविजयाचा नायक ठरलेल्या युवराजचे नाव यंदाच्या स्पर्धेसाठी खिजगणतीतही नाही. निराशेने ग्रासलेल्या युवराजने अखेर भारतासाठी पुन्हा खेळायला मिळेल असे वाटत नाही, अशी आपली खंत व्यक्त केली
आहे.
कर्करोगानंतर युवराजने ट्वेन्टी-२० सामन्यामध्ये पुनरागमन केले. पण बांगलादेशमधील ट्वेन्टी-२० विश्वचषकातील फलंदाजीमुळे तो टीकेचा धनी ठरला होता. त्याने शेवटचा एकदिवसीय सामना डिसेंबर २०१३ला खेळला असून त्यानंतर त्याला एकदिवसीय संघात स्थान मिळवता आलेले नाही.
‘‘भारतीय संघात पुनरागमन करायचे, हे निश्चितच माझे ध्येय आहे. जेव्हा तुम्हाला संघात स्थान मिळत नाही, तेव्हा तुम्ही निराश होता. गेली दोन वर्षे माझ्यासाठी चांगले गेले नाहीत. बरेच चढ-उतार या कालावधीमध्ये मी पाहिले आहेत. त्यामुळे संघात स्थान द्यायचे की नाही हा माझा निर्णय नसेल. मला अशी आशा आहे की, या गोष्टीही बदलतील, मला संघात पुनरागमन करता येईल, पण जर असे झाले नाही तर मी निराशेच्या गर्तेमध्ये अडकून जाईन. मी फक्त माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो,’’ असे युवराजने सांगितले.
भारतीय संघात पुन्हा स्थान मिळणार नाही, असा विचार कधी आला आहे का, असे विचारल्यावर युवराज म्हणाला की, ‘‘नक्कीच, मला भारतासाठी पुन्हा कधीही खेळता येऊ शकत नाही, अशी शक्यता आहे. मी या गोष्टीचा विचार केला आहे. पण भारतीय संघात मला स्थान मिळेल, अशी आशा मला वाटते. मला विश्वास आहे की, मी नक्कीच भारतीय संघात पुनरागमन करेन. त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत.’’