ज्या क्षणाची भारतीय गेल्या २२ वर्षांपासून वाट पाहत होते, ते अखेर मंगळवारी सत्यात उतरले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या युवा संघाने अखेर विजयाचा सेतू बांधला. मालिका विजयाचे सोने लुटत सोन्याच्या लंकेतील हा विजय नक्कीच सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारताने श्रीलंकेवर ११७ धावांनी विजय मिळवीत मालिका २-१ अशी खिशात टाकली. भारताने श्रीलंकेपुढे ३८६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने शतक झळकावत भारताला विजयसाठी झगडवले खरे, पण त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या चेतेश्वर पुजाराला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तर या मालिकेत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या आर. अश्विनला मालिकावीराचा पुरस्काराने गौरविण्यात आले.
भारताने पाचव्या दिवसाची चांगली सुरुवात करत श्रीलंकेच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले होते. वेगवान गोलंदाज उमेश यादवने कुशल सिल्व्हाला (२७) बाद करत श्रीलंकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर अश्विननेही श्रीलंकेच्या लहिरू थिरीमानेला (१२) बाद केल्यामुळे भारतीय संघ लवकरच विजय मिळवण्याचे स्वप्न पाहत होता. पण कर्णधार अँजेलो मॅथ्यूज आणि कुशल परेरा यांनी सहाव्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी रचल्यामुळे भारतीय संघ विजयापासून वंचित राहणारा का, असे चर्वितचर्वण व्हायला सुरुवात झाली होती. पण अश्विनने परेराचा काटा काढत ही जोडी फोडली आणि भारताला हायसे वाटले. परेराने ११ चौकारांच्या जोरावर ७० धावांची खेळी साकारली. परेरा बाद झाल्यावर अवघ्या सात धावांमध्ये इशांत शर्माने मॅथ्यूजला पायचीत पकडत भारताच्या विजयासमोरील मोठा अडसर दूर केला. मॅथ्यूज बाद झाल्यावर १८ धावांमध्ये श्रीलंकेचा दुसरा डाव आटोपला आणि भारताने मालिका विजयाचा जल्लेश साजरा केला.
विराटचा पहिला विजय
महेंद्रसिंग धोनीकडून कसोटी कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यावर पहिल्याच मालिकेत विराट कोहलीने मालिकाविजय मिळवण्याची कामगिरी केली आहे.
१९९३ मध्ये मिळवला होता विजय
भारताने मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली १९९३ साली श्रीलंकेत १-० अशी मालिका जिंकली होती. त्यानंतर तब्बल २२ वर्षांनी भारताला श्रीलंकेला त्यांच्या मातील धूळ चारता आली आहे.
चार वर्षांनी देशाबाहेर विजय
भारताला गेल्या चार वर्षांमध्ये देशाबाहेर विजय मिळवता आला नव्हता. यापूर्वी भारताने जून २०११ साली वेस्ट इंडिजला पराभूत केले होते.
धावफलक
भारत (पहिला डाव) : १००.१ षटकांत सर्व बाद ३१२.
श्रीलंका (पहिला डाव) : ५२.२ षटकांत सर्व बाद २०१.
भारत (दुसरा डाव) : ७६ षटकांत सर्व बाद २७४.
श्रीलंका (दुसरा डाव) : उपुल थरंगा झे. ओझा गो. इशांत ०, कुशल सिल्व्हा झे. पुजारा गो. यादव २७, दिमुथ करुणारत्ने झे. ओझा गो. यादव ०, दिनेश चंडिमल झे. कोहली गो. इशांत १८, अँजेलो मॅथ्यूज पायचीत गो. इशांत ११०, लहिरु थिरीमाने झे. राहुल गो. अश्विन १२, कुशल परेरा झे. रोहित गो. अश्विन ७०, रंगना हेराथ पायचीत गो. अश्विन ११, थरिंडू कौशल नाबाद १, धम्मिका प्रसाद झे. बिन्नी गो. अश्विन ६, न्यूवान प्रदीप पायचीत गो. मिश्रा ०, अवांतर (बाइज ४, लेग बाइज २, नो बॉल ७) १३,
एकूण ८५ षटकांत सर्व बाद २६८.
बाद क्रम : १-१, २-२, ३-२१, ४-७४, ५-१०७, ६-२४२, ७-२४९, ८-२५७, ९-२६३, १०-२६८.
गोलंदाजी : इशांत शर्मा १९-५-३२-३, उमेश यादव १५-३-६५-२, स्टुअर्ट बिन्नी १३-३-४९-०, अमित मिश्रा १८-१-४७-१, आर. अश्विन २०-२-६९-४.
निकाल : भारताचा ११७ धावांनी विजय
मालिका २-१ अशी जिंकली
सामनावीर : चेतेश्वर पुजारा
मालिकावीर : आर. अश्विन

भारताच्या युवा संघासाठी हा देदीप्यमान असा मैलाचा दगड आहे, असे मला वाटते. यापूर्वी भारतीय संघाने ०-१ अशा पिछाडीवरून विजय मिळवलेला नाही, त्यामुळे हा विजय सर्वासाठी प्रेरणादायी असून आम्ही इतिहास रचला आहे. संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केलीच, पण संघाबाहेर असलेल्या खेळाडूंनी आपल्याकडील अनुभवाने मार्गदर्शन केले.
विराट कोहली, भारताचा कर्णधार

नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आम्ही यशस्वी ठरलो खरे, पण त्यांच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी फलंदाजांनी निराशाच केली. त्यामुळे हा पराभव निराशाजनक आहे. आम्ही भारताला ३०० धावांपर्यंत रोखण्यात यशस्वी ठरलो असतो तर नक्कीच सामना जिंकता आला असता.
– अँजेलो मॅथ्यूज, श्रीलंकेचा कर्णधार

भारतीय संघाचे मनपूर्वक अभिनंदन. पहिली कसोटी गमावल्यानंतर संघाने केलेले पुनरागमन विलक्षण आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील युवा संघाने असेच दिमाखदार विजय मिळवावेत.
सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार

भारतीय क्रिकेटमधील प्रत्येकाच्या वतीने श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मन:पूर्वक अभिनंदन. २२ वर्षांनंतर श्रीलंकेत मालिका विजय साकारणे यातूनच या विजयाची दुर्मीळता आणि महती सिद्ध होते. भारतीय संघ आणि व्यवस्थापनाने दिमाखदार कामगिरीसह इतिहासात आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. विराट कोहलीने नव्या आणि युवा संघाचे समर्थपणे नेतृत्व केले.
जगमोहन दालमिया, बीसीसीआय अध्यक्ष

भारतीय संघाचे त्रिवार अभिनंदन. नियमित कर्णधार म्हणून पहिल्याच मोहिमेत विराट कोहलीने मिळवलेला मालिका विजय संस्मरणीय आहे. आणखी असंख्य मालिका विजय तो साजरे करील. विराट आणि त्याच्या युवा संघाने अभिमानास्पद खेळासह संघाला विजयपथावर नेले. या विजयांमध्ये सातत्य आणण्यासाठी ते कसोशीने प्रयत्न करतील याची खात्री आहे.
अनुराग ठाकूर, बीसीसीआय सचिव