इन्चॉनला आशियाई क्रीडा स्पध्रेत हॉकीचे सुवर्णपदक मिळाल्यानंतर काही दिवसांतच आणखी एका सुवर्णक्षणाची अनुभूती भारताच्या कनिष्ठ संघाने दिली आहे. तमन दया हॉकी स्टेडियमवर भारताने ग्रेट ब्रिटनचा २-१ अशा फरकाने पाडाव करून सलग दुसऱ्यांदा सुल्तान जोहर चषक हॉकी स्पर्धा जिंकण्याची किमया साधली. पेनल्टी कॉर्नरद्वारे दोन गोल साकारणारा हरमनप्रीत सिंग भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
साखळीत ब्रिटनने भारताला २-० असे हरवले होते. त्यामुळे ग्रेट ब्रिटनकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात होते. परंतु सामना संपायला ४५ सेकंदांचा अवधी असताना बरोबरीची कोंडी फुटली आणि भारताच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर भारतीय संघाने तिरंगा फडकावत जल्लोष साजरा केला.
हरमनप्रीत सिंगने ४५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून भारताच्या खात्यावर पहिला गोल झळकावला. हा त्याचा स्पध्रेतील सातवा गोल ठरला. मग ५३व्या मिनिटाला वरुण कुमारने पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल साकारण्याची संधी दवडली. सॅम्युअल फ्रेंचने ५५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल नोंदवून ग्रेट ब्रिटनला बरोबरी साधून दिली.
६२व्या मिनिटाला झालेल्या वादामुळे भारताच्या अभिनव पांडेला हिरवे कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे गोलरक्षक सुबोध तिर्कीला बदली खेळाडू म्हणून संधी मिळाली. सामना संपायला काही क्षणांचा अवधी असताना गोलफलक १-१ बरोबरीत होता. ९०व्या मिनिटाला लाभलेल्या पेनल्टी कॉर्नरचे हरमनप्रीतने गोलमध्ये रूपांतर करीत भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला.