आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बॅच व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत कमालीची उत्सुकता होती मात्र प्रत्यक्षात ही भेट फुसकाच बार ठरला आहे. मोदी यांनी २०२४च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी प्रस्ताव ठेवला नाही, असे बॅच यांनी सांगितल्यामुळे भारत ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करण्याच्या शक्यतेवर आता पूर्णविराम मिळाला आहे.
भारतीय ऑलिम्पिक महासंघावरील (आयओए) बंदी आयओसीने गतवर्षी मागे घेतली असल्यामुळे ऑलिम्पिकसाठी प्रस्ताव सादर करणे हा खूप आततायी प्रयत्न होईल व एवढय़ा लवकर भारताने प्रस्ताव देऊ नये, असे बॅच यांनी स्पष्ट केले. आयओसीचे अध्यक्षपदी २०१३ मध्ये विराजमान झाल्यानंतर बॅच यांची ही पहिलीच भारतभेट होती. त्यांनी मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासमवेत चर्चा केली.
बॅच यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले, भारत २०२४ च्या ऑलिम्पिक संयोजनासाठी प्रस्ताव सादर करणार आहे या अफवांचे देखील मला आश्चर्य वाटले. कारण असा प्रस्ताव सादर करणे ही खूपच घाईघाईची गोष्ट असेल. भारताने ऑलिम्पिक संयोजनासाठी जरूर प्रयत्न करावा मात्र त्याआधी त्यांनी खूप जय्यत तयारी केली पाहिजे. क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती केली पाहिजे. मोदी यांनीही आम्हाला या स्पर्धा आयोजित करण्याची घाई नसल्याचे स्पष्ट केले. २०२४ च्या संयोजनपदाचा प्रस्ताव १५ सप्टेंबरपूर्वी पाठवायचा आहे. एवढय़ा कमी वेळात सर्व तयारी करणे अशक्य असल्याचे मोदी यांनीही मान्य केले आहे. एक मात्र नक्की की मोदी यांच्याकडे क्रीडा क्षेत्रासाठी अतिशय सकारात्मक दृष्टी आहे.   
क्रीडा विधेयकाबाबत बॅच यांच्याकडे तक्रार
* देशातील क्रीडा क्षेत्रात केंद्र शासनाकडून ढवळाढवळ होत असल्याची तक्रार भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बॅच यांच्याकडे केली आहे.
* केंद्र शासनाने क्रीडा नियमावली केली आहे. त्या मसुद्यास आपला विरोध असून, याबाबत बॅच यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यामध्ये बदल करण्याची विनंती करावी, असेही आयओएने बॅच यांना सांगितले.
* बॅच यांनी आयओएच्या प्रतिनिधींबरोबर तसेच त्यांनी केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनवाल यांच्याशीही एक तास चर्चा केली. या वेळी क्रीडा सचिव अजित शरण, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे सरसंचालक इंजेती श्रीनिवास, आयओएचे माजी सचिव व आयओसीचे मानद सदस्य रणधीरसिंग हे उपस्थित होते.