ऑस्ट्रेलियापुढे भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करण्याआधी भारताच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण बिघडले होते. शिखर धवनने फलंदाजीला न जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे अशांतता पसरली होती. त्यामुळेच भारताच्या कामगिरीवर परिणाम झाला आणि आम्ही दुसरी कसोटी गमावली, अशी कबुली भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिली.
सकाळी नेटमध्ये सराव करताना धवनच्या उजव्या मनगटाला दुखापत झाली. त्यामुळे त्याने आपली आदल्या दिवशीची खेळी पुढे सुरू करण्यास इन्कार केला. म्हणून विराट कोहलीला अतिशय कमी वेळात क्रीझवर जाण्यास सांगण्यात आले.
‘‘शिखरला दुखापत झाली आहे, याची आम्हाला कल्पना होती, परंतु फलंदाजीला उतरण्यास त्याला कोणतीही अडचण येणार नाही. तो नंतर फलंदाजीला आल्याचे तुम्ही पाहिले. परंतु त्याने मैदानावर जाण्यास नकार दिल्यामुळे ड्रेसिंग रूममधील वातावरण बिघडले. चर्चेनंतर यावर तोडगा काढण्यात आला,’’ असे धोनीने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.
धोनी पुढे म्हणाला, ‘‘या चर्चेमुळे आम्हाला उशीर झाला. कोहलीला फक्त ५-१० मिनिटांची पूर्वसूचना देत मैदानावर फलंदाजीसाठी धाडण्यात आले. ही गोष्ट आम्ही कदाचित अधिक चांगल्या पद्धतीने हाताळली असतील.’’
खराब खेळपट्टीमुळे दुखापती
सरावाच्या खराब व्यवस्थेबाबत भारताच्या संघ व्यवस्थापनाने नाराजी प्रकट केली आहे. क्वीन्सलँड क्रिकेट असोसिएशनने पुरवलेल्या निकृष्ट दर्जाच्या खेळपट्टीवर सराव करताना सलामीवीर शिखर धवन आणि विराट कोहली यांना दुखापती झाल्या. त्यामुळे धवनने फलंदाजीला जाण्यास नकार दिला. मग वेदनाशामक इंजेक्शन घेऊन तो नंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. त्याच्या दुखऱ्या मनगटाची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे, असे संघ व्यवस्थापनाने सांगितले.
भोजनव्यवस्थेबाबत नाराजी
याचप्रमाणे शाकाहारी भोजन व्यवस्थेवर इशांत शर्मा आणि सुरेश रैना यांनी नाराजी प्रकट केली होती. तिसऱ्या दिवशी उपाहाराला शाकाहारी भोजन व्यवस्था असल्यामुळे इशांत आणि रैना यांनी स्टेडियमबाहेर जाणे पसंत केले होते. याबाबत धोनी म्हणाला, ‘‘मला खरेच वाद निर्माण करायचा नाही. परंतु या ठिकाणी मिळालेल्या व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हायला हवी.’’