प्रतिष्ठेच्या नॅशनल बास्केटबॉल लीग स्पर्धेत खेळणारा भारतीय वंशाचा पहिला बास्केटबॉलपटू सिम भुल्लर भारतभेटीवर येणार आहे. २ ते ७ मे या कालावधीत भुल्लर बास्केटबॉलच्या प्रचारासाठी भारतात दाखल होणार आहे. एनबीए स्पर्धेचा अंतर्गत उपक्रम असणाऱ्या रिलायन्स फाऊंडेशन ज्युनियर एनबीए कार्यक्रमाच्या निमित्ताने भुल्लर देशभरातील १४० युवा बास्केटबॉलपटूंना मार्गदर्शन करणार आहे.
भारतात जाण्याच्या विचाराने मी उत्साहित आहे. देशभरात बास्केटबॉलची लोकप्रियता कशी आहे हे जाणून घेण्याचा आणि युवा बास्केटबॉलपटूंशी चर्चा करण्याची मला संधी मिळणार आहे. एनबीएपर्यंत माझ्या वाटचालीचा प्रवास मी त्यांना सांगणार आहे. माझी कहाणी त्यांना प्रेरणादायी ठरेल अशी आशा आहे.
२२ वर्षीय उंचपुरा भुल्लर २ मे रोजी मुंबईत चाहत्यांशी संवाद साधणार आहे आणि त्यानंतर आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या एक्स्ट्रा इनिंग्ज कार्यक्रमात सहभागी होणार आहे. ४ मे रोजी भुल्लर रिलायन्स फाऊंडेशनच्या एनबीए एलिट राष्ट्रीय शिबिराचे उद्घाटन करणार आहे. त्यानंतर तो अमृतसरच्या सुवर्णमंदिराला भेट देणार असून, पिंगलवारा शहरातील विविध दुर्धर व्याधींनी त्रस्त रुग्णांना भेटणार आहे.
बास्केटबॉलचा प्रसार छोटय़ा शहरांमध्ये व्हावा यासाठी सुरू करण्यात आलेला एनबीए उपक्रमाअंतर्गत आठ शहरांमधील १००० शाळांमध्ये खेळाचा प्रसार करण्यात आला आहे. खेळाडूंच्या बरोबरीने बास्केटबॉल प्रशिक्षकांना या कार्यक्रमाअंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले आहे. ब्रुस बोवेन, मुग्सी बोग्स, स्विन कॅश यांच्यासह तमिका कॅचिंग्स हे नामांकित बास्केटबॉलपटू चंदीगढ, कोलकाता, कोची, लुधियाना, मुंबईत खेळाडू आणि प्रशिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत.