छोटय़ा लक्ष्याचा पाठलाग करणे संथ खेळपट्टीवर किती अवघड असते याचा धडा राजस्थान रॉयल्सला देत चेन्नई सुपर किंग्जने शानदार विजय मिळवला. फलंदाजीसाठी कठीण खेळपट्टीवर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १४० धावा केल्या. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये हे लक्ष्य माफक होते. मात्र खेळपट्टीचा नूर ओळखत चतुरपणे गोलंदाजी करत चेन्नईने राजस्थानसाठी हे माफक आव्हानही खडतर बनवले आणि ७ धावांनी सुरेख विजय मिळवला. अष्टपैलू खेळ करत चेन्नईच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या रवींद्र जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
अपेक्षित सलामी देऊ न शकणारा अभिषेक नायर ५ धावा करून तंबूत परतला. अश्विनला मोठा फटका मारण्याचा अजिंक्य रहाणेचा (१५) प्रयत्न फसला. जडेजाने शेन वॉटसनला चकवले, त्याने ७ धावा केल्या. संजू सॅमसन (१६) जडेजाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. स्टीव्हन स्मिथ (१९) आणि स्टुअर्ट बिन्नी (८) जोडीने छोटी भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मोहित शर्माने बिन्नीला तर जडेजाने स्मिथला बाद करत राजस्थानला अडचणीत टाकले. स्फोटक खेळी करण्यासाठी प्रसिद्ध जेम्स फॉकनरला (४)धोनीकडे झेल देण्यास इश्वर पांडेने भाग पाडले आणि राजस्थानच्या विजयाच्या आशा मावळल्या. फॉकनर बाद झाल्यानंतर रजत भाटिया आणि धवल कुलकर्णी जोडीने नवव्या विकेटसाठी २८ धावांची भागीदारी करत राजस्थानच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. वाढत्या धावगतीचे दडपण असल्यामुळे बेन हिल्फेनहॉसच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा भाटियाचा प्रयत्न फसला, त्याने २३ धावा केल्या. भाटिया बाद झाल्यानंतर धवल कुलकर्णी आणि प्रवीण तांबे या दोन मुंबईकरांनी हार न मानता संघर्ष सुरुच ठेवला. या दोघांनी शेवटच्या विकेटसाठी २० धावांची भागीदारी केली. धवल कुलकर्णीने नाबाद २७ धावांची खेळी करत संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले मात्र ते अपुरेच ठरले. राजस्थानला १३३ धावा करता आल्या.
तत्पूर्वी ड्वेन स्मिथ आणि रवींद्र जडेजा यांच्या संयमी खेळींच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने १४० धावांची मजल मारली. राजस्थानने नाणेफेक जिंकून चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ड्वेन स्मिथ-ब्रेंडन मॅक्क्युलम जोडीने ३५ धावांची सलामी दिली. जेम्स फॉकनरने मॅक्क्युलमला बाद करत ही जोडी फोडली. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या ड्वेन स्मिथ अर्धशतकानंतर लगेचच बाद झाला. त्याने २८ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह २८ चेंडूत ५० धावा केल्या. भरवशाचा सुरेश रैना केवळ ४ धावा काढून तंबूत परतला. चोरटी धाव घेण्याच्या नादात फॅफ डू प्लेसिस धावचीत झाला. प्रवीण तांबेच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात महेंद्रसिंग धोनी ५ धावा करून बाद झाला. १५ धावांच्या अंतरात सगळे महत्त्वाचे फलंदाज माघारी परतल्याने रवींद्र जडेजाने डावाची सूत्रे हाती घेतली. त्याने ३३ चेंडूत नाबाद ३६ धावा केल्याने चेन्नईला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. मिथुन मन्हासने १० तर रवीचंद्रन अश्विनने ९ धावा करत जडेजाला चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ६ बाद १४० (ड्वेन स्मिथ ५०, रवींद्र जडेजा ३६, रजत भाटिया २/१३)विजयी विरुद्ध राजस्थान रॉयल्स : १९. ५ षटकांत सर्वबाद १३३ (धवल कुलकर्णी २७, रजत भाटिया २३, रवींद्र जडेजा ४/३३)
सामनावीर : रवींद्र जडेजा