‘गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि महेंद्रसिंह  धोनी यांच्यातील वादामुळे भारतीय संघात फूट पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या गोष्टी बिनबुडाच्या असून, यात कोणतेही तथ्य नाही. संघात दुफळी नव्हे तर एकोपा आहे आणि त्यामुळेच गेल्या वर्षभरात संघाने दमदार प्रदर्शन केले आहे. ७० टक्के सामने आपण जिंकलो आहोत. आपल्या कामाशी एकरूप असलेल्या खेळाडूंचा प्रामाणिक संघ आहे,’ असे सांगताना संघसंचालक रवी शास्त्री यांनी सांगितले.
‘कोहली आणि धोनी यांना एकमेकांबद्दल आत्यंतिक आदर आहे. कोहली तरुण आहे, प्रांजळपणे मत मांडणारा तो निर्भीड खेळाडू आहे. कर्णधारपदाची जबाबदारीने तो अधिक परिपक्व होईल. कर्णधारपदी स्थिरावण्यासाठी त्याला एक ते दोन वर्षांचा वेळ देण्याची गरज आहे. धोनी सार्वकालीन महान खेळाडू आहे. अव्वल दर्जाच्या निकषांनुसार तो खेळतो. कसोटी क्रिकेटमधून त्याने घेतलेली निवृत्ती हे त्याचे द्योतक. शंभर कसोटी खेळण्याचा मोह कोणालाही झाला असता, मात्र धोनी अपवाद आहे. कोहली धोनीकडून अनेक गोष्टी शिकतो आहे. वाद असण्याचे काही कारण नाही,’ असे शास्त्री यांनी स्पष्ट केले.
युवा खेळाडूंविषयी विचारले असता शास्त्री म्हणाले, ‘अजिंक्य, विराट, रोहित, धवन यांनी आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली आहे. २६ ते २८ वयोगटातल्या या तिघांना सर्वोत्तम खेळ करण्याची संधी आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या वलयाचे दडपण न घेता त्यांनी खेळ केला. हे सुखावणारे आहे. विश्वचषकात त्यांनी आपला खेळ उंचावला.
गोलंदाजीचा स्तर उंचावण्याची आवश्यकता असल्याचे शास्त्री यांनी सांगितले. २० विकेट घेऊ शकणारे गोलंदाज असतील तरच कसोटी जिंकता येऊ शकते. विभिन्न वातावरणात जुळवून घेऊ शकतील अशा गोलंदाजांची फळी निर्माण होणे गरजेचे आहे. केवळ वेग किंवा फक्त स्विंग यापेक्षा सर्वसमावेशक गोलंदाज काळाची गरज आहे. टप्प्यातली अचूकता आणि परिस्थितीनुसार खेळात बदल करण्याची गरज या गोष्टी गोलंदाजांसाठी महत्त्वाच्या आहेत.