माकरेस बघदातीसच्या दुहेरी कामगिरीच्या जोरावर पुणे मराठाज संघाने हैदराबाद एसेसला सुपरटायब्रेकरद्वारा २५-२४ असे हरवित चॅम्पियन्स टेनिस लीगमध्ये अंतिम फेरी गाठली. मात्र हैदराबादच्या मार्टिना हिंगिस व मार्क फिलिपोसिस या वलयांकित खेळाडूंनी बहारदार खेळाच्या जोरावर चाहत्यांना जिंकले.
शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या या लढतींचा आनंद दोन हजार प्रेक्षकांनी घेतला. सामन्यात कोण जिंकते, यापेक्षाही हिंगिस, फिलिपोसिस यांच्या खेळाबद्दल त्यांना कमालीची उत्कंठा होती. फिलिपोसिसने आपलाच प्रशिक्षक व माजी विम्बल्डन विजेता पॅट कॅशवर ६-३ अशी मात करीत हैदराबादला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र पुण्याच्या माकरेस बघदातीस व रडवानस्का यांनी मिश्रदुहेरीत हिंगिस व मिखाईल युझेनी यांना ६-३ असे हरवित १-१ अशी बरोबरी साधली. हिंगिसने जागतिक क्रमवारीतील अव्वल दर्जाची खेळाडू अ‍ॅग्नीझेका रडवानस्का हिला ६-४ असे हरविताना आपण अजूनही उत्तम खेळ करू शकतो याचा प्रत्यय घडविला. तिच्या विजयामुळे हैदराबादला २-१ अशी आघाडी मिळाली.
बघदातीस याने साकेत मायनेनी याच्या साथीत युझेनी व जीवन नेंदूझीयन यांचा ६-३ असा पराभव करीत सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली. युझेनी याने एकेरीत बघदातीसवर ६-५ असा विजय मिळविला. तथापि एकूण सामन्यात २४-२४ अशा गेम्सची बरोबरी झाल्यामुळे सुपरटायब्रेकरचा उपयोग करण्यात आला. त्यामध्ये बघदातीस याने युझेनीला ५-४ असे हरविले.

भारतीय प्रेक्षक व भोजनावर हिंगिस व रडवानस्का खूश
भारतीय प्रेक्षक भरभरून स्वागत करतात व खेळाचा निखळ आनंद घेतात. या स्पर्धेनिमित्त आम्ही जेथे जेथे गेलो, तेथील प्रेक्षकांचा उत्साह पाहून आम्हाला खूप आनंद झाला आहे. भारतीय खाद्यपदार्थ जरी मसालेदार व चटकदार असले, तरी आम्ही त्याचा मनापासून स्वाद घेतला, असे हिंगिस व रडवानस्का यांनी सांगितले. येथे पुन्हा आम्ही खेळण्यासाठी उत्सुक आहोत, असेही त्या म्हणाल्या.