स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणात एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन यांची भूमिका अंतर्गत व्यापाऱ्याची होती, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. याचप्रमाणे न्यायमूर्ती मुकुल मुदगल समितीच्या अहवालातील मातब्बर क्रिकेटपटूंची नावे जाहीर करण्यासंदर्भातील याचिका सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे.
‘‘मयप्पन महत्त्वाची माहिती पुरवत होता आणि कुणी तरी त्यावर सट्टा खेळत होता, म्हणजेच तो अंतर्गत व्यापार आहे,’’ असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर आणि एफ. एम. आय. कलिफुल्ला यांनी सांगितले. श्रीनिवासन यांचा जावई मयप्पन हा चेन्नई सुपर किंग्ज संघाचाच एक भाग होता. तो संघाच्या प्रत्येक कार्यक्रमाला असायचा. मग संघाची व्यूहरचना तयार करणे असो किंवा डग-आऊटमध्ये संघासोबत बसणे.
वरिष्ठ कायदेतज्ज्ञ हरीश साळवे यांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ बिहारची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडली. श्रीनिवासन यांनी मयप्पन हा फक्तक्रिकेटचाहता असे सांगून आपल्या आयपीएल संघाला या प्रकरणापासून वाचवण्याचा प्रयत्न केला होता.
मुदगल समितीच्या पहिल्या अहवालात चेन्नई सुपर किंग्ज आणि इंडिया सिमेंटचे मालक श्रीनिवासन मयप्पनला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे नमूद करण्यात आले होते. परंतु दुसऱ्या अहवालात मात्र याविषयी मौन बाळगण्यात आले आहे, असा प्रश्न खंडपीठाने विचारला.
सर्वोच्च न्यायालयाने आधीच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. त्यात संघटनेची एकात्मता टिकून राहणे आवश्यक असते, असे त्यांनी नमूद केले होते, असे साळवे यांनी सांगितले.
मुदगल समितीच्या अहवालात ‘व्यक्ती-२’ आणि ‘व्यक्ती-३’ असे नमूद करण्यात आले आहे. या खेळाडूंची ओळख न्यायालयाने स्पष्ट करावी आणि चर्चा थांबवावी, असे साळवे यांनी सांगितले.
याबाबत खंडपीठाने सांगितले की, ‘‘मुदगल समितीमध्ये नमूद केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यासंदर्भातील याचिकेवर पुढील तारखेला सुनावणी होईल. या प्रकरणी पुढील सुनावणी २७ नोव्हेंबरला होईल.’’