आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने केलेली नवीन नियमावली आमच्यासाठी अनुकूल असून आम्ही येथील आशियाई स्पर्धेत अव्वल दर्जाची कामगिरी करू, असे भारतीय हॉकी संघाचा उपकर्णधार पी. आर. श्रीजेशने सांगितले. नवीन नियमावलीनुसार आता प्रत्येक सामन्यात चार डाव राहणार आहेत. हा बदल आमच्यासाठी फायदेशीर आहे, कारण आम्ही हॉकी लीगमध्ये अशा स्वरूपाचेच सामने खेळलो आहोत. त्यामुळे खेळ अधिक वेगवान होणार असला, तरी खेळाडूंची दमछाकही कमी होणार आहे. या स्वरूपामुळे प्रत्येक डावानंतर असलेल्या विश्रांतीमुळे खेळाडूंना पुन्हा ऊर्जा मिळण्याची संधी आहे, असे श्रीजेशने सांगितले. तो पुढे म्हणाला, आम्ही कसून सराव करीत आहोत. संघातील प्रत्येक खेळाडू मनापासून येथील सराव शिबिरात आपल्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. आक्रमणाची मुख्य मदार एस. व्ही. सुनील याच्यावर आहे. त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खूप चांगली कामगिरी केली होती. प्रतिस्पर्धी खेळाडूंवर दडपण आणण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.
संघातील युवा खेळाडू मनप्रीतसिंग म्हणाला की, मधल्या फळीतील खेळाडूंवर संघाची मुख्य मदार असते आणि मला या फळीत खेळण्याची संधी मिळत आहे. मला त्यासाठी सरदारासिंग याचे मार्गदर्शन मिळाले आहे. सरदारामुळेच दानिश मुजताबा, धरमवीरसिंग व चिंगलेनासाना सिंग यांनाही प्रेरणा मिळाली आहे. आम्ही सर्व जण येथे सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी उत्सुक झालो आहोत.