पुरस्कारांच्यावेळी वाद-विवाद ठरलेलेच, पण ज्यांच्यामुळे पुन्हा एकदा वाद पेटला होता त्या दोन्ही खेळाडूंना या वेळी ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये स्थान देण्यात आले नाही. भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि मल्ल सुशील कुमार या दोन्ही ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंचा पुरस्कारांच्या यादीमध्ये नाव नव्हते. या वेळी पद्मभूषण हा पुरस्कार सतपाल सिंग यांना देण्यात आला. तर भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदारासिंग व महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज यांना पद्मश्री सन्मान मिळाला आहे. पद्मश्री सन्मानार्थीमध्ये सबा अंजुम (हॉकी), आरुनिमा सिन्हा (गिर्यारोहण), पी.व्ही.सिंधू (बॅडमिंटन) यांचाही समावेश आहे.
सतपाल हे छत्रसाल स्टेडियममध्ये आखाडा चालवित असून त्यांनी सुशीलकुमार, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त यांच्यासह अनेक अव्वल दर्जाचे मल्ल घडविले आहेत.
सरदारासिंगच्या मार्गदर्शनाखाली भारताने गतवर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक तर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. महिलांच्या हॉकीत सबा अंजुमच्या कौतुकास्पद कामगिरीमुळेच भारताला राष्ट्रकुल (२००२), आशिया चषक (२००४) मध्ये सुवर्णपदक मिळाले होते. तसेच २००६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीत भारताने कांस्यपदक मिळविले होते.
सायना नेहवालची वारसदार म्हणून नावलौकिक मिळविलेल्या सिंधू हिने लागोपाठ दोन जागतिक स्पर्धामध्ये कांस्यपदक मिळविणारी पहिली भारतीय महिला खेळाडू होण्याचा मान मिळविला आहे. तिने गतवर्षी राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धामध्ये कांस्यपदक पटकाविले.
मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने अनेक शानदार विजय मिळविला आहे. तिने आतापर्यंत एक दिवसीय १४८ सामन्यांमध्ये ४ हजार ७९१ धावा केल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा तिच्या नावावर
आहेत.
आरुनिमा सिन्हाने एक पाय कृत्रिम असूनही जगातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. ही कामगिरी करणारी ती पहिलीच महिला गिर्यारोहक आहे. तिने अलीकडेच उत्तरप्रदेशमध्ये गरीब व नैपुण्यवान खेळाडूंच्या विकासाकरिता प्रशिक्षण अकादमी सुरू केली आहे.