‘प्रो-कबड्डी लीग’चा थरार शनिवारपासून मुंबईच्या एनएससीआय क्रीडा संकुलात सुरू होणार आहे. ‘स्टार स्पोर्ट्स’ क्रीडा वाहिनीवर थेट प्रक्षेपण होणाऱ्या या स्पध्रेच्या सादरीकरणाच्या दृष्टीने कबड्डी या खेळाच्या मूळ नियमांमध्ये काही तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. कबड्डी खेळात प्रतिस्पर्धी संघाचे सहा किंवा अधिक खेळाडू मैदानावर असताना बोनस रेषेला स्पर्श केल्यास चढाईपटूला बोनस गुणसुद्धा मिळतो. याचप्रमाणे क्षेत्ररक्षकांनाही बोनस गुण मिळण्याची तरतूद प्रो-कबड्डीमध्ये करण्यात आली आहे. तीन किंवा कमी संख्येने क्षेत्ररक्षकांनी एखाद्या चढाईपटूला बाद केल्यास त्याला ‘सुपर कॅच’ म्हणून नमूद करून त्या संघाला बोनस गुण मिळेल.
निष्फळ चढायांची संख्या कमी करण्यासाठीसुद्धा तांत्रिक समितीने क्लृप्ती शोधून काढली आहे. प्रत्येक दोन चढायांनंतरची तिसरी चढाई निष्फळ ठरल्यास प्रतिस्पर्धी संघाला गुण मिळेल. तसेच कोणत्याही आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पध्रेसाठी खेळाडूंना ८० किलोची वजनमर्यादा असते. परंतु अनेक दर्जेदार खेळाडूंचा खेळ पाहता यावा या दृष्टीने ही वजनमर्यादा ८५ किलो करण्यात आली आहे.
प्रो-कबड्डी लीगमधील प्रत्येक सामन्याच्या विजयाचे संघाला पाच गुण मिळतील, तर सामना बरोबरीत सुटल्यास प्रत्येकी तीन गुण मिळतील. याचप्रमाणे ७ किंवा कमी गुणांच्या फरकाने पराभव पत्करल्यास हरणाऱ्या संघाला एक गुण बोनस मिळेल.ह्ण