सचिन तेंडुलकरला मी आदर्श मानतो आणि तो माझ्यासह आम्हा सर्वांना देवासमान आहे, असे गौरवोद्गार भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सचिनबद्दल बोलताना काढले. उत्तर अमेरिकेत बिहार-झारखंड संघाने न्यूजर्सी येथे एका सोहळ्यात महेंद्रसिंग धोनीचा विशेष सत्कार केला. यावेळी बोलताना धोनीने सचिनच्या क्रिकेटमधील अमुल्य योगदानाबद्दल स्तुती केली.
सचिनची फलंदाजी पाहून मी मोठा झालो आणि आमची कारकीर्द घडली. सचिनची क्रिकेट साधना, स्वभावातील विनम्र भाव सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. सचिनने अनेक विक्रम केले पण त्याने विनम्रपणा कधीच सोडला नाही. त्याचा मैदानावरील शिस्तीचा मोठा प्रभाव आमच्यावर झाला. त्यामुळे सचिनसोबत खेळता आले हे मी भाग्य समजतो, असे धोनी यावेळी म्हणाला.
एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून आपल्यात सुधारणा व्हावी या प्रयत्नानेच तो नेहमी मैदानात उतरत असे. त्यामुळे सचिन एक आदर्श म्हणून प्रभावी ठरतो. देशातील युवांनी आपला आदर्श मानावे असा सचिन आहे, असेही तो पुढे म्हणाला. तसेच आम्ही जी प्रेरणा सचिनकडून घेतली ती इतरांनीही घ्यावी अशी अपेक्षा धोनीने व्यक्त केली.
आपले लक्ष्य गाठण्यासाठी तुम्ही आज काय करीत आहात ते महत्त्वाचे आहे. आयुष्यात नेहमी व्यावहारिक आणि प्रामाणिक रहावे. तसेच ध्येय गाठण्यासाठी स्वप्न पाहावित मात्र, वर्तमान विसरू नये, असा कानमंत्रही धोनीने यावेळी देऊ केला.