चीन खुली स्पर्धा जिंकल्यामुळे माझा आत्मविश्वास अधिकच उंचावला आहे आणि आता जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्याचे माझे ध्येय आहे, असे भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने सांगितले.
सायनाने चीनमधील स्पर्धेत विजेतेपद मिळवत जागतिक क्रमवारीत चौथे स्थान घेतले आहे. ती म्हणाली, ‘‘यंदाच्या मोसमात तीन स्पर्धा जिंकून मी नवव्या क्रमांकावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. ही माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. पुढील महिन्यात दुबई सुपर सीरिजमध्येही सर्वोत्तम यश मिळविण्याचा माझा प्रयत्न राहील. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत तंदुरुस्ती टिकविण्यावर माझा प्रयत्न राहणार आहे. त्याचप्रमाणे चीनच्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंबरोबर अधिकाधिक सामने खेळण्याचेही माझे ध्येय आहे. त्यामुळे मला त्यांच्या कौशल्याचा बारकाईने अभ्यास करता येईल.’’  
‘‘जागतिक मानांकनात अग्रस्थान केव्हा मिळवीन असे सांगता येणे कठीण आहे. कारण माझ्यासमोर प्रामुख्याने चीनच्याच खेळाडूंचे आव्हान असणार आहे. हे लक्ष्य साधण्यासाठी मी खूप मेहनत करीत आहे. त्याचबरोबर २०१६पर्यंत विविध स्पर्धामध्ये विजेतेपद मिळविण्यावर माझा भर राहणार आहे,’’ असेही सायना म्हणाली.
सायना सध्या बंगळुरू येथे प्रशिक्षक विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. त्या संदर्भात ती म्हणाली, ‘‘विमल कुमार यांनी माझ्या खेळातील चुका दूर करण्यावर भर दिला आहे. त्यांनी केलेल्या सूचनांनुसार मी खेळाच्या तंत्रात बदल केला व त्यामुळेच मी पुन्हा विजेतेपदाच्या मार्गावर आरूढ झाले आहे. आशियाई स्पर्धेनंतर माझ्या खेळात खूपच सुधारणा झाली आहे. माझ्या खेळाबाबत आम्ही खूप दीर्घकाळ चर्चा करीत असतो व ते मला परतीचे फटके मारावेत याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करतात. त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी मी करीत असते.’’
चीन खुल्या स्पर्धेत भारताच्या कदम्बी श्रीकांतने अग्रमानांकित लिन डॅन याच्यावर सनसनाटी विजय मिळवत अजिंक्यपद मिळविले. त्याविषयी सायना म्हणाली, ‘‘चीनच्या खेळाडूवर भारतीय खेळाडू विजय मिळवू शकत नाही, ही गोष्ट आता इतिहासजमा झाली आहे. मात्र ही काही सोपी गोष्ट नाही. त्याकरिता खूपच झगडावे लागते. त्यांच्याविरुद्ध सर्वोत्तम खेळच करावा लागतो. एखादी चूकही सामन्यास कलाटणी देऊ शकते, ही गोष्टही लक्षात ठेवावी लागते. आता चाहत्यांनी माझ्याकडून पदकांची अपेक्षा ठेवायला हरकत नाही.’’

पेले यांची प्रकृती स्थिर
साव पावलो : ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना साव पावलो येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ‘‘एडसन अरांतेस डो नासिमेंटो ऊर्फ पेले हे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे,’’ असे अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. ७४ वर्षीय पेले यांच्यावर १३ नोव्हेंबरला शस्त्रक्रिया करण्यात आली होती. एक दिवस त्यांना आइनस्टाइन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पेले यांचे जवळचे मित्र जोस फोर्नोस रॉड्रिगेझ यांनी सांगितले. मात्र त्यांनी पेले यांच्या तब्येतीविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला.