भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवाल ऑस्ट्रेलियन सुपर सीरिजच्या निमित्ताने आणखी एका जेतेपदासाठी सज्ज झाली आहे. गेल्या वर्षी याच स्पर्धेचे जेतेपद पटकावत सायनाने दोन वर्षांचा सुपर सीरिज जेतेपदांचा दुष्काळ संपुष्टात आणला होता. जेतेपद आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखण्यासाठी सायना उत्सुक आहे. 

गेल्या वर्षी कॅरोलिन मारिनवर मात करत सायनाने जेतेपद पटकावले होते. त्यानंतर सायना आणि कॅरोलिन दोघींच्याही कारकीर्दीचा आलेख उंचावला आहे. सायनाचा सलामीचा मुकाबला पात्रता फेरीचा अडथळा पार करत मुख्य फेरी गाठणाऱ्या खेळाडूशी असणार आहे. चीनची सुन यू विरुद्ध सायनाची पहिली लढत होण्याची शक्यचा आहे. तिच्याविरुद्ध सायनाची कामगिरी ३-१ अशी आहे. दुसऱ्या फेरीचा अडथळा पार केल्यास सायनासमोर चीनच्या सिझियान वांगचे आव्हान असणार आहे.
दोन वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या पी. व्ही. सिंधूला सलामीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या वांग यिहानचा सामना करावा लागणार आहे.
पुरुषांमध्ये जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या किदम्बी श्रीकांतसमोर डेन्मार्कच्या हान्स क्रिस्तियन विथिनघुसचे आव्हान असणार आहे. पारुपल्ली कश्यपची लढत सहाव्या मानांकित वांग झेनमिंगशी होणार आहे.
दुहेरीत ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांची लढत नेदरलँड्सच्या समंथा बार्निग आणि आयरिस टेबलिंग जोडीशी होणार आहे. पुरुष दुहेरीत अक्षय देवलकर आणि प्रणव चोप्रा यांच्यासमोर चीनच्या काई युन आणि कांग जुन जोडीचे आव्हान आहे. अश्विनी पोनप्पा मिश्र दुहेरीत प्रणव चोप्राच्या साथीने नशीब अजमावणार आहे.