बॅडमिंटन विश्वाचा मानबिंदू असणाऱ्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड सुपर सीरिज स्पर्धेत सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांत या दोघांना उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. साखळी गटाच्या तिन्ही लढतीत दिमाखदार विजय साकारणाऱ्या सायनाचा विजयरथ तैपेईच्या तैई झू यिंगने ११-२१, २१-१३, २१-९ असा रोखला तर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या चेन लाँगने श्रीकांतचे आव्हान २१-१८, २१-९ असे संपुष्टात आणले.
पहिल्या गेममध्ये यिंगच्या हातून टाळता येण्यासारख्या चुका झाल्या. याचा फायदा उठवत सायनाने ११-५ अशी मजबूत आघाडी घेतली. सायनाचे शैलीदार फटके आणि नेटजवळच्या अचूक खेळासमोर यिंग निरुत्तर ठरली.

दुसऱ्या गेममध्ये यिंगने ५-४ अशी निसटती आघाडी मिळवली. यानंतर यिंगने फटक्यांमधली अचूकता वाढवली. ११-६ अशी आघाडी घेत यिंगने आगेकूच केली. मात्र सायनाने पुनरागमन करत १२-१२ अशी बरोबरी केली. मात्र आक्रमक पवित्रा स्वीकारत यिंगने १७-१२ आघाडी मिळवली. ही आघाडी कायम राखत यिंगने दुसरा गेम जिंकला.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये यिंगने ६-२ आघाडी घेतली. ही आघाडी १५-४ अशी वाढवली. यिंगचे स्मॅशेस, क्रॉसकोर्ट फटके आणि वेगवान खेळासमोर सायनाच्या हातून चुका झाल्या आणि तिसऱ्या गेमसह यिंगने सामन्यावर कब्जा केला.
पुरुषांच्या लढतीत श्रीकांतने पहिल्या गेममध्ये ११-६ अशी आघाडी घेतली. मात्र चेनने ताकदवान स्मॅशेसचे श्रीकांतवर आक्रमण करत पिछाडी भरून काढत पहिला गेम नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये चेनच्या झंझावाती खेळासमोर श्रीकांत निष्प्रभ ठरला.