ज्येष्ठ संघटक आणि उपाध्यक्ष संभाजी पाटील यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या सरकार्यवाहपदी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. असोसिएशनचे विद्यमान सरकार्यवाह रमेश देवाडीकर यांना तांत्रिक कारणास्तव हे पद सोडावे लागले, त्यामुळे त्यांच्या जागी ही नियुक्ती झाली आहे.
असोसिएशनच्या पदावर काम करताना जिल्हा संघटनेचा पदाधिकारी असणे आवश्यक असते. ठाणे जिल्हा असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत देवाडीकर यांच्यासह त्यांच्या पॅनेलला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे देवाडीकर यांचे पद जाणार हे निश्चित होते. शनिवारी येथे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय समितीची बैठक झाली. त्यामध्ये उपाध्यक्ष संभाजी पाटील यांची एकमताने प्रभारी सरकार्यवाह म्हणून निवड झाली. पुढील वर्षी कायदेशीर सल्ला घेऊन असोसिएशनची निवडणूक घेण्यात येईल. त्यामध्ये संभाजी पाटील यांची सरकार्यवाहपदी अधिकृत निवड केली जाईल. तसेच उपाध्यक्षपदाचीही निवडणूक घेतली जाईल. संभाजी पाटील हे कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव आहेत.
शासकीय समितीच्या बैठकीत ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रतिनिधी म्हणून मनोज पाटील, देवराम भोईर व अरुण म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यामुळे त्यांच्या संघांना राज्य स्पर्धेत भाग घेण्यास परवानगी देण्यात आली.
राज्यस्तरावर प्रीमियर लीग
खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व या खेळाची लोकप्रियता वाढावी, या हेतूने राज्य स्तरावर प्रीमियर कबड्डी लीग आयोजित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ही लीग मे महिन्यात घेण्यात येणार असून पाच किंवा सहा शहरांमध्ये ती घेतली जाईल.
बैठकीचे ठिकाण बदलल्याने संघटकांची त्रेधातिरपीठ
शासकीय समितीची बैठक पूर्वनियोजित कार्यक्रमपत्रिकेनुसार शिवछत्रपती क्रीडानगरीत घेतली जाणार होती, मात्र ऐनवेळी ही बैठक महापौर निवासात घेतली गेली. परगावच्या काही प्रतिनिधींना याबाबत निरोप न मिळाल्यामुळे हे प्रतिनिधी शिवछत्रपती क्रीडानगरीत गेले व तेथून त्यांना पुन्हा पुणे शहरात माघारी यावे लागले. या संघटकांनी या बदलाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
पूर्णवेळ प्रशिक्षणावर भर देणार -देवाडीकर
राज्य संघटनेच्या सूचनेनुसार मी सरकार्यवाहपदाचा त्याग केला आहे. आता पूर्ण वेळ नवोदित व उदयोन्मुख खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहे, असे देवाडीकर यांनी सांगितले.