क्रिकेट विश्वातील सगळ्यात श्रीमंत संघटना अशी बिरुदावली मिरवणाऱ्या बीसीसीआयचा कारभार किती अगम्य आहे याचे एक ढळढळीत उदाहरण समोर आले आहे. गेल्यावर्षी बीसीसीआय सट्टेबाजी, स्पॉटफिक्सिंग आणि वादविवादांच्या भोवऱ्यात अडकलेले असताना सुनील गावस्कर यांनी इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचे अध्यक्षपद भूषवले होते. मात्र वर्षभरानंतरही गावस्कर यांना या हंगामी अध्यक्षपदासाठीचे १.९० कोटी रुपये वेतन मिळालेले नाही. यंदाची आयपीएल सुरू झाल्यानंतर तरी हे वेतन मिळावे यासाठी गावस्कर यांनी बीसीसीआयला विनंती केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बीसीसीआयने गावस्कर यांची आयपीएलच्या अध्यक्षस्थानी नियुक्ती केली होती. या कामासाठी गावस्कर यांना योग्य मानधन देण्यात यावे, असेही न्यायालयाच्या आदेशात पुढे म्हटले होते. मात्र एक वर्षांनंतरही न्यायालयाच्या आदेशाचा बीसीसीआयला विसर पडलेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गावस्कर यांनी यासंदर्भात बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीला पत्र लिहिले आहे.
आयपीएल अध्यक्ष म्हणून कार्यरत असल्याने गावस्कर समालोचक, स्तंभलेखन आणि वाहिनीतज्ज्ञ म्हणून काम करू शकले नव्हते. या सर्व कामांचे मानधन लक्षात घेऊन बीसीसीआय गावस्कर यांना १.९० कोटी रुपये देणे अपेक्षित आहे. मात्र कार्यकारिणीने अद्याप याला मंजुरी दिली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

’सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे अनिवार्य आहे. मात्र  मानधन प्रस्तावाला बोर्डाच्या आर्थिक समितीकडून मंजुरी मिळणे आवश्यक आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर गावस्कर यांना वेतन देण्यात येईल, असे या सूत्राने स्पष्ट केले.