सुनील नरीन हा आमच्यासाठी संघातील अव्वल फिरकीपटू आहे आणि तो गोलंदाजीच्या संशयित शैलीच्या प्रकरणातून बाहेर पडेल, असा विश्वास वेस्ट इंडिज संघाचे प्रशिक्षक स्टुअर्ट विल्यम्स यांनी व्यक्त केला. वेस्ट इंडिजचा संघ भारतीय दौऱ्यावर आला असून ३ आणि ५ ऑक्टोबरला ते दोन सराव सामने खेळणार आहेत.
‘‘आम्ही अजून नरीनशी याबाबत चर्चा केलेली नाही. सुनील हा अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. संघाचा कर्णधार ड्वेन ब्राव्हो चेन्नई सुपर किंग्जकडून चॅम्पियन्स लीगमध्ये सहभागी असल्याने त्याला सारे काही माहिती असेल. काही दिवसांमध्येच आम्ही एकत्रपणे याबाबतीत चर्चा करणार आहोत, असे विल्यम्स यांनी सांगितले.
आयसीसीच्या नवीन नियमांनुसार यापूर्वी दोन  गोलंदाज संशयित गोलंदाजी शैलीच्या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत. त्याचबरोबर चॅम्पियन्स लीगमध्ये हे दोन गोलंदाज या प्रकरणात अडकले आहेत.
भारतीय दौऱ्याबाबत विल्यम्स म्हणाले की, ‘‘आम्ही भारताच्या दौऱ्यासाठी सज्ज आहोत. संघाकडून या दौऱ्यासाठी चांगली तयारी झाली आहे. दोन सराव सामन्यांचा आम्हाला चांगलाच फायदा होईल.’’