दिल्लीतले इंदिरा गांधी इन्डोअर स्टेडियम. निमित्त होते इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग स्पर्धेचा तिसरा दिवस. कोर्टच्या एका बाजूला सार्वकालीन महान खेळाडू रॉजर फेडरर आणि त्याच्या साथीला प्रसिद्ध बॉलीवूड k04अभिनेता आमीर खान. कोर्टच्या दुसऱ्या बाजूला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला नोव्हाक जोकोव्हिच आणि त्याच्या साथीला आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणारी सानिया मिर्झा. प्रत्येक चित्रपटात बहुविध भूमिका साकारणाऱ्या आमीर खानची सव्‍‌र्हिस काही केल्या नेटच्या पलीकडे जाईना. शेवटी कंटाळून दोन्ही दिग्गज नेटवरच येऊन बसले. त्यांच्या वजनामुळे नेट खाली सरकले आणि अखेर आमीरची सव्‍‌र्हिस नेटच्या पल्याड गेली आणि महारथींनी नि:श्वास सोडला. आता आपण खरे टेनिस खेळायला मोकळे असे वाटत असतानाच रितेश देशमुख, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण यांचे आगमन झाले. पाऊण तासानंतर लुटुपुटुच्या टेनिसमधून फेडरर-जोकोव्हिचची सुटका झाली. पैसा आणि संयोजकांचा हट्ट यासाठी महान खेळाडूंनाही काय करावे लागते, याचा प्रत्यय या घटनेने दिला.

लीग लाटेचा ज्वर भारतीय टेनिसमध्ये शिरला आणि म्हणूनच दोन महिन्यांत महेश भूपती निर्मित आयपीटीएल, विजय अमृतराज निर्मित चॅम्पियन्स टेनिस लीग आणि अमोनरा एज्युकेशन फाऊंडेशन निर्मित प्रीमिअर टेनिस लीग अशा तीन स्पर्धा झाल्या. क्रिकेटमधल्या इंडियन प्रीमिअर लीग या पैशाची खाणसदृश स्पर्धेनेच टेनिसमधल्या स्पर्धाना प्रेरणा दिली आहे. त्यामुळे आर्थिक नफा हे या लीगचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पैसा कमवणे अजिबातच वाईट गोष्ट नाही मात्र तो सच्च्या मार्गाने कमावणे नैतिकदृष्टय़ा महत्त्वाचे असते. भूपतीच्या लीगमध्ये रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच, जो विलफ्रेड सोंगा, मारिन चिलीच, सेरेना विल्यम्स, मारिया शारापोव्हा अशा जगातील अव्वल दहामधील खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू धर्मादाय तत्त्वावर सहभागी होणे शक्य नाही. साहजिकच फ्रँचाइजी आणि खेळाडू लिलाव यामध्ये कोटय़वधींचा व्यवहार होणे क्रमप्राप्त आहे. परंतु फ्रँचाइजींनी खर्चलेली रक्कम, खेळाडूंना लिलावात मिळालेली रक्कम, भव्य आयोजनासाठी झालेला खर्च याविषयी वारंवार खोदूनही तपशील उघड करण्यात आलेला नाही. हीच गोष्ट चॅम्पियन्स टेनिस लीग स्पर्धेलाही लागू आहे.
या आर्थिक तपशीलाचा सामान्य प्रेक्षकांशी संबंध येतो तिकिटांच्या निमित्ताने. आयपीएल किंवा इंडियन सुपर लीग स्पर्धेच्या तिकिटांचे दर ५०० ते २००० रुपये असतात. आयपीटीएलच्या तिकिटांचे कमाल दर ३००० तर कमाल दर ४९,००० रुपये होते. ही तिकीटे संकेतस्थळावर उपलब्ध होती. २० मिनिटांत तिकिटे हाऊसफुल झाल्याचे अभिमानाने सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र १६,००० प्रेक्षकक्षमतेच्या हाऊसफुल स्टेडियममध्ये अनेक स्टँड रिकामे असल्याचे विरोधी चित्र पाहायला मिळाले. चॅम्पियन्स टेनिल लीगचे दर सामान्यांना परवडतील असे होते, मात्र प्रसिद्धीचे फारसे गांभीर्य न दाखवल्यामुळे लोकांपर्यंत ही स्पर्धा पोहचलीच नाही आणि संयोजकांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश आहे, आता तरी या असे सांगावे लागले. या दोन्ही स्पर्धामुळे प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन टेनिस पाहण्याच्या चळवळीची रूजवात झाली आहे, ही सकारात्मक बाब. आतापर्यंत देशांतर्गत स्पर्धा कुठे आयोजित होतात याची माहितीही दिली जात नव्हती आणि तिथे प्रेक्षकांना खेळ पाहण्यासाठी अशी काहीही व्यवस्था नसते. मात्र टेनिसमधील लीग पर्वामुळे हे चित्र बदलते आहे.
भारतीय टेनिसपटूंच्या खेळात दर्जात्मक सुधारणा झाल्यास लीगचे आयोजन आपल्यासाठी फायदेशीर होऊ शकते. आयपीटीएल स्पर्धेत सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा हे दोनच भारतीय खेळाडू आहेत. लीगपूर्वीच ते आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित आहेत. चॅम्पियन्स लीग टेनिसमध्ये मोठय़ा प्रमाणावर भारतीय खेळाडू आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसह खेळण्याचा आणि त्यांच्या अनुभवाचा भारतीय खेळाडूंना निश्चित फायदा होणार आहे. पारंपरिक नियमांना कात्री लावत खेळ वेगवान आणि खमंग करताना दूरचित्रवाणीसाठी प्रक्षेपणाला साजेसे स्वरुप राखण्याचा संयोजकांचा प्रयत्न आहे मात्र अनेक नियम गोंधळात टाकणारे आहेत आणि पुढच्या हंगामात त्यात बदल व्हावेत असे खेळाडूंनी स्पष्ट सांगितले आहे.
खेळाचा दर्जा आणि त्यातले गांभीर्य खरे असले तरी केव्हाही बदली होणारे खेळाडू आणि त्यांच्या सामन्यांचा बदलणारा क्रम, सोबतीला असणारे आदळआपट संगीत आणि वेगवान खेळासाठी केलेले चिवित्र नियम यामुळे पारंपरिक टेनिसचा गाभा हरवण्याची शक्यता आहे. मैत्रीपूर्ण किंवा प्रदर्शनीय सामन्यांना असलेले दिखाऊ स्वरूप टाळणे हे सर्वच लीगसमोरचे मोठे आव्हान आहे.