आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षेत्रात महासत्ता होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अमेरिकेने महिला फुटबॉल विश्वचषकाच्या जेतेपदासह शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. गतविजेत्या जपानला नामोहरम करत अमेरिकच्या महिला संघाने जेतेपदाची कमाई केली. अमेरिकेचे हे तिसरे विश्वचषक जेतेपद आहे. तिशी ओलांडलेली मात्र अचंबित करणारी तंदुरुस्ती आणि विजिगीषु वृत्तीचे प्रतीक असलेली कार्ली लॉइड अमेरिकेच्या विजयाची शिल्पकार ठरली. दडपणाच्या अंतिम लढतीत हॅट्ट्रिक नोंदवत कार्लीने अमेरिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
विश्वचषक इतिहासात अंतिम फेरीत हॅट्ट्रिक नोंदविणारी पहिली महिला खेळाडू आहे. २०११च्या अंतिम फेरीत अमेरिकेला जपानकडून पराभव पत्करावा लागला होता आणि त्याची परतफेड करताना अमेरिकेने तिसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. याचबरोबरच सर्वाधिक तीन वेळा विश्वचषक उंचावणारा एकमेव संघाचा मान अमेरिकेला मिळाला आहे.
जेतेपदाच्या निश्चयाने आत्तापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमेरिकेने अंतिम लढतीत सुरुवातीपासूनच आक्रमणावर भर दिला. अवघ्या १६ मिनिटांत अमेरिकेने ४ गोल करून जपानवर दडपण निर्माण केले. तिसऱ्याच मिनिटाला कर्णधार कार्लीने अमेरिकेचे खाते उघडले. दोन मिनिटांच्या आतच कार्लीने ही आघाडी दुप्पट केली. १४ व्या मिनिटाला तिच्या मदतीला लौरेन हॉलिडे धावून आली आणि अमेरिकेने ३-० अशी आघाडी घेतली. कार्लीने १६व्या मिनिटाला गोल करून हॅट्ट्रिक साजरी करताना अवघ्या १६ मिनिटांत संघाला ४-० अशा मजबूत स्थितीत आणले. २७व्या मिनिटाला जपानकडून युकी ऑगिमीने पहिला गोल केला. मध्यंतरापर्यंत अमेरिकेने सामन्यावर ४-१ अशी मजबूत पकड घेतली होती. त्यामुळे सामन्याचे चित्र जवळपास स्पष्ट होते.
मध्यंतरानंतर जपानकडून कोणत्याच करिष्म्याची अपेक्षाही उरली नव्हती. ५२व्या मिनिटाला ज्युली जॉनस्टनच्या स्वयंगोलने जपानच्या खात्यात दुसरा गोल जमा केला, परंतु हा गोल पराभव टाळण्यासाठी अपुराच होता. त्याला ५४व्या मिनिटाला टॉबिन हिथने उत्तर देत अमेरिकेला ५-२ असे आघाडीवर ठेवले. त्यानंतर जपानकडून कोणताच संघर्ष पाहायला मिळाला नाही आणि अमेरिकेने तिसऱ्यांदा विश्वचषक उंचावला.

आज मी एका मोहिमेवर होते आणि ती फत्ते झाली. सुरुवातीपासून जपानवर दडपण निर्माण केले, तर त्यांच्या खेळावर परिणाम होईल, याची जाणीव आम्हाला होती.
– कार्ली लॉइड, अमेरिकेची कर्णधार

मला कुणीतरी चिमटा काढा. सामन्यात आक्रमक सुरुवात करण्याची आम्ही रणनीती आखली होती आणि खेळाडूंनी योजनाबरहुकूम खेळ केला आणि म्हणूनच विजय साकारला.
जील एलिस, अमेरिकेचे प्रशिक्षक

०३ मोठय़ा स्पध्रेत अमेरिका आणि जपान यांच्यातील ही तिसरी लढत आहे. याआधी २०१२च्या ऑलिम्पिक स्पध्रेच्या अंतिम लढतीत अमेरिकेने जपानवर २-१ असा विजय मिळवून सुवर्णपदक पटकावले होते. या लढतीत कार्लीने दोन्ही गोल केले होते.

०३ अमेरिकेने १९९१ आणि १९९९ नंतर प्रथमच विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. याचबरोबरच सर्वाधिक तीन वेळा विश्वचषक उंचावणारा एकमेव संघाचा मान अमेरिकेला मिळाला आहे. त्यापाठोपाठ दोन जेतेपदे पटकावणाऱ्या जर्मनी संघाचा क्रमांक येतो.