कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्य़ामधील करकाला तालुक्यामध्ये वसलेले हरमुंडे हे निसर्गाचे वरदान लाभलेले हिरवेगार गाव. या गावातील नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून. भोजा आणि किट्टी पुजारी या शेतकरी दाम्पत्याची ममता ही कन्या. तिच्या लहानपणी या गावात बरेच वष्रे वीज नव्हती आणि प्राथमिक सोयीसुविधांचाही अभाव होता; पण गेल्या काही वर्षांत हिरमुंडे गाव विजेमुळे आणि कबड्डीपटू ममता पुजारीमुळे प्रकाशमान झाले आहे. ‘ममताचे गाव’ म्हणून ते आता ओळखले जाऊ लागले आहे. भारतीय रेल्वेत नोकरी करणाऱ्या आणि भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ५ फूट १० इंच उंचीच्या ‘ममता एक्स्प्रेस’ने आपल्या यशाची पताका राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकत ठेवली आहे. ममताच्या नेतृत्वाखाली भारताने २०११मध्ये पाटण्यात जेव्हा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली, तेव्हा तिच्या गावीही अनोखा जल्लोष साजरा करण्यात आला. शुक्रवारी क्रीडा दिनाच्या दिवशी नवी दिल्लीमध्ये ममताला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने सध्या चालू असलेली प्रो-कबड्डी लीग आणि आगामी आशियाई क्रीडा स्पध्रेतील आव्हाने याबाबत तिच्याशी केलेली खास बातचीत-
*देशातील सर्वोत्तम क्रीडापटू म्हणून दिला जाणारा अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल तू काय सांगशील?
माझ्या कबड्डी कारकिर्दीला मिळालेला हा फार मोठा सन्मान आहे, असे मी मानते. त्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे. माझी कारकीर्द घडवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वाना हा पुरस्कार मी समर्पित करते. माझ्या हिरमुंडे गावीसुद्धा हा आनंद साजरा केला जात आहे.
*आगामी आशियाई क्रीडा स्पध्रेसाठी भारताची तयारी कशी चालू आहे?
आशियाई स्पध्रेकडे भारतीय संघ गांभीर्याने पाहात आहे. गेले काही महिने आमचा कसून सराव सुरू आहे. आता ५ सप्टेंबरपासून भोपाळमध्ये अखेरचे तयारी शिबीर असेल. आम्ही या स्पध्रेत सहभागी होणाऱ्या कोणत्या संघाविरुद्ध कसे खेळायचे, याची रणनीती आखली आहे. कोरिया, थायलंड आणि जपान या संघांकडून चांगला प्रतिकार होऊ शकेल. गेल्या वर्षी इन्चॉनला झालेल्या इन्डोअर आशियाई स्पध्रेत कोरियाने आम्हाला चांगली लढत दिली होती. त्यांची खेळण्याची शैली भारताप्रमाणेच असल्यामुळे त्यांचे प्रमुख आव्हान आमच्यासमोर असेल. काही वर्षांपूर्वी आम्हाला फारशी स्पर्धा नव्हती. उपांत्य किंवा अंतिम फेरीतच काहीसे आव्हान असायचे; परंतु आता परिस्थिती तशी नाही; पण सुवर्णपदक जिंकायचे, हा एकच ध्यास आम्ही जोपासला आहे.
*सध्या चालू असलेल्या प्रो-कबड्डीचे विश्लेषण तू कसे  करशील?
आम्ही सर्व महिला कबड्डीपटू साडेसातलाच टीव्हीसमोर येऊन बसतो. टीव्हीवरील या खेळाचे देखणेपण हे कौतुकास्पद आहे. देशात क्रिकेटनंतर दुसरा क्रमांक कबड्डीचाच लागतो आहे, हे अभिमानास्पद आहे. भारतातील पुरुष खेळाडू आपल्या कामगिरीने लक्ष वेधत आहेत. उत्कंठापूर्ण सामने, रणनीती आणि खेळाडूंचे कौशल्य या लीगमध्ये पाहायला मिळत आहे. देशात क्रीडारसिकांनी कबड्डीचा मनमुराद आनंद लुटला. या साऱ्या गोष्टी भारावून टाकणाऱ्या आहेत.
*पुढील वर्षीपासून महिलांचीसुद्धा प्रो-कबड्डी लीग होणार आहे, याविषयी काय वाटते?
पुढील वर्षी आम्हीसुद्धा प्रो-कबड्डी खेळणार आहोत, याची प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे एक प्रकारचे भावनिक नाते या लीगशी निर्माण झाले आहे. ही प्रतीक्षा लवकरच संपावी, अशी अपेक्षा आहे. पहिल्या वर्षीचा थरार पाहून या वर्षी महिलांची प्रो-कबड्डी का नाही, असा प्रश्न पडतो; परंतु पहिले वर्ष प्रो-कबड्डीचे कसोटीचे होते. खेळ कसा जनमानसात रुजतो, याची परीक्षा होती; परंतु या परीक्षेत त्यांना अभूतपूर्व यश मिळाले आहे. पुरुषांप्रमाणेच महिलांचे प्रो-कबड्डीचे सामनेही तितकेच रोमहर्षक होतील आणि क्रीडारसिकांचा आकडा आणखी वाढेल, याविषयी मी आशावादी आहे.
*प्रो-कबड्डीमुळे खेळाडूंना सेलिब्रिटीचा दर्जा मिळत आहे. त्यांच्यासोबत छायाचित्रासाठी आणि स्वाक्षऱ्यांसाठी लोक उत्सुक दिसतात..
आम्ही विश्वचषक, आशियाई क्रीडा स्पर्धा जिंकून आल्यावर आमचे कौतुक झाले; पण नंतर आम्हाला लोक विसरायचे. परंतु आता टीव्हीवर सुमारे महिनाभर प्रो-कबड्डीचे सामने चालू असल्यामुळे त्यांना एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणेच चांगली प्रसिद्धी मिळत आहे. हे खेळाडू सर्वाना माहीत झाले आहेत. प्रो-कबड्डी दरवर्षी होणार असल्याने कबड्डीपटूंना क्रिकेटपटूप्रमाणेच क्रीडारसिक ओळखतील.
*प्रो-कबड्डीत समाविष्ट करण्यात आलेल्या नव्या नियमांबाबत तुझे मत काय आहे?
थर्ड रेड, सुपर कॅच यांसारख्या कबड्डीच्या नव्या नियमांमुळे सामन्यांमधील रंगत वाढली आहे आणि त्यामुळे क्रीडाशौकिनांचा खेळामधील रस वाढला आहे. त्यामुळे एकतर्फी सामने झाल्याचे क्वचितच पाहायला मिळते आहे. या बदलांमुळे अखेरच्या क्षणापर्यंत कोणत्या संघाकडे विजयाचे पारडे झुकेल, हे सांगणे कठीण झाले आहे.