कोणताही अनपेक्षित, आश्चर्याचा धक्का न देता विजिगीषूवृत्तीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाला गवसणी घातली. कोणत्याही क्षणी आम्ही सामन्यात पुनरागमन करू शकतो, हे ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा दाखवून दिले. प्रत्येक सामना आम्हीच जिंकणार, या जिद्दीने मैदानात उतरणाऱ्या ऑस्ट्रेलियाने चोख व्यावसायिक कामगिरीचा उत्तम वस्तुपाठ पेश केला. जिंकण्याची ईर्षां, त्याला लढाऊबाण्याची जोड देत परिपक्व कामगिरी करत ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत न्यूझीलंडवर सात विकेट्सने सहज विजय मिळवत पाचव्यांदा विश्वचषक पटकावण्याची किमया साधली. यापूर्वी १९८७, १९९९, २००३ आणि २००७ साली ऑस्ट्रेलियाने विश्वचषक पटकावला होता. कर्णधार मायकेल क्लार्कने क्रिकेटला अद्भुतपणे अलविदा करताना देशवासीयांना विश्वचषकाची अविस्मरणीय भेट दिली.
नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला, तरी कधीही हार न मानणाऱ्या ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच सामन्यावर अंकुश ठेवला होता. गँट्र एलियट त्यांच्यापासून सामना हिरावून घेणार असे वाटत असतानाच फलंदाजांसीठी कुरण समजल्या जाणाऱ्या ‘पॉवर प्ले’मध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. अवघ्या ३३ धावांत त्यांनी सात बळी मिळवत न्यूझीलंडच्या संघाला १८३ धावांत तंबूत धाडले.
आव्हानाचा पाठलाग करताना क्लार्कने (७४) कर्णधाराला साजेशी अर्धशतकी खेळी साकारली, त्याला स्टीव्हन स्मिथचीही (नाबाद ५६) सुरेख साथ मिळाली. ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुनरागमन करून देणाऱ्या जेम्स फॉकनरला सामनावीराच्या, तर स्पर्धेत सातत्यपूर्ण भेदक वेगवान गोलंदाजी करणाऱ्या मिचेल स्टार्कला विश्वचषकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

परमोच्च आनंदाचा हा क्षण आहे. आम्ही अप्रतिम कामगिरी केली. न्यूझीलंडला कोणत्याही खेळात पराभूत करणे सोपे नसते. या देदीप्यमान कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. हा विश्वचषक मी फिल ह्य़ुजला समर्पित करतो, तो आमच्या संघातील सोळावा खेळाडू होता.
मायकेल क्लार्क, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

विश्वचषक स्पर्धा आमच्यासाठी अद्भुत सफरीसारखी होती. अंतिमत: आमच्यासमोर बलाढय़ ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. त्यांनी लौकिकाला साजेसा खेळ करत जेतेपद पटकावले. ते जेतेपदाचे हकदार आहेत. आम्ही जेतेपद पटकावू शकलो नाही, त्याचा पश्चात्ताप नाही.
– ब्रेंडन मॅक्क्युलम, न्यूझीलंडचा कर्णधार