जागतिक क्रमवारीत शिखरस्थानी भरारी घेतलेल्या सायना नेहवालने कारकिर्दीत पहिल्यांदाच भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची किमया रविवारी साधली. याचप्रमाणे पुरुष गटात किदम्बी श्रीकांतने जेतेपदाची कमाई करत चाहत्यांना दुहेरी आनंद दिला.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालच्या कारकिर्दीतले १५व्या सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकावले. २०११मध्ये भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला मानाचा ‘सुपर सीरिज’ दर्जा देण्यात आला. मात्र यानंतर प्रत्येकवेळी सायनाला जेतेपदाने हुलकावणी दिली होती. घरच्या मैदानात, चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा असतानाही सायनाला जेतेपदापर्यंत वाटचाल करता आली नव्हती.
यंदा थायलंडच्या रत्नाचोक इन्थॅनॉनसारख्या तुल्यबळ प्रतिस्पर्धीला नमवत सायनाने जेतेपदाला गवसणी घातली. सायनाने ही लढत २१-१६, २१-१४ अशी जिंकली. या लढतीपूर्वी रत्नाचोकविरुद्धच्या आठ सामन्यांत सायना ५-३ अशी आघाडीवर होती. या विजयासह सायनाने आपले वर्चस्व कायम राखले.
लंडन ऑलिम्पिकनंतर खराब फॉर्म आणि दुखापतींमुळे तब्बल दीड वर्ष सायनाला सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकावता आले नव्हते. गोपीचंद यांच्याऐवजी विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याच्या तिच्या निर्णयावर टीका झाली होती. मात्र विमल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळातले बारकावे घोटीव करत नव्या ऊर्जेसह परतलेल्या सायनाने तडाखेबंद प्रदर्शनासह टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.
काही दिवसांपूर्वी प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत तिने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. हा टप्पा गाठणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली होती. या कामगिरीमुळेच जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानाच्या दिशेने तिची वाटचाल पक्की झाली. भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील जेतेपदाने क्रमवारीतील अव्वल स्थानाला अनोखे कोंदण लाभले आहे.