सध्या संपूर्ण देशाचे लक्ष राजधानी नवी दिल्लीकडे लागून राहिले आहे. राजधानी असल्यामुळे ते तसे साहजिक आहे आणि एरवीही देशवासीयांचे लक्ष दिल्लीकडे असतेच; पण सध्या विशेष लक्ष असण्याची दोन महत्त्वाची कारणे आहेत. पहिले म्हणजे प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून राजधानी दिल्लीतील सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा येत आहेत. प्रजासत्ताक दिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून येणारे ते पहिलेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत आणि हा केवळ समारंभ किंवा केवळ उपचार नाही, तर त्यात एक वेगळी शिष्टाईदेखील दडलेली आहे. म्हणून देशवासीयांचे लक्ष दिल्लीकडे आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे येत्या ७ फेब्रुवारी रोजी राजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकांना सामोरी जात असून तिकडचा निकाल काय लागतो, याची उत्सुकता निवडणुकीत सहभागी झालेल्या राजकीय पक्षांप्रमाणेच देशवासीयांनाही लागून राहिलेली आहे. ही निवडणूक अनेक अर्थानी महत्त्वाची ठरली आहे. दुसरीकडे सध्या घडत असलेल्या घटनांनंतर आता आणखी काय काय पाहायला मिळणार, अशी उत्सुकताही देशवासीयांच्या मनात निर्माण झाली आहे. या उत्सुकतेला चांगले-वाईट असे दोन्ही पदर आहेत. या पाश्र्वभूमीवर सध्या व्हॉटस्अॅप आणि फेसबुकसारख्या सोशल मेसेंजर आणि मीडिया संकेतस्थळांवरून फिरणारा एक गमतीशीर संदेशही बोलका ठरावा. 

‘‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतभेटीवर येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना दिल्लीपासून किमान २०० किलोमीटर्स दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. कारण स्पष्ट आहे.. ते दिल्लीत राहिले तर दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत बातमी वाचायला मिळेल- ‘ओबामांचाही भाजपात प्रवेश!’
या संदेशातील गमतीचा भाग वगळला तर आता सत्तास्थानी बहुमताने दाखल झालेल्या भाजपामध्ये कोणीही प्रवेश करून शकतो, अशीच स्थिती सर्वत्र दिसते आहे. त्यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण राहिलेले नाही. अलीकडेच राज ठाकरेंच्या मनसेचे तीन शिलेदार भाजपात प्रवेश करते झाले. भाजपामध्ये कोणाला प्रवेश द्यायचा याबाबत झालेल्या एका बैठकीत पक्षाध्यक्षांनी म्हणे काही संकेत दिले होते. एखाददुसरा भ्रष्टाचाराचा आरोप असेल तर फारशी हरकत नाही; पण मोठा आरोप असेल तर मात्र अशी व्यक्ती नकोच नको, असे सांगितले होते, अशी चर्चा आहे. प्रत्यक्षात मात्र मोठे आरोप असलेली मंडळीही स्वत:ची साम्राज्ये वाचविण्यासाठी आता भाजपाच्या वळचणीला आलेली दिसतात. शिवाय मुंबईजवळचेच आणखी एक ‘साम्राज्य’वादी नेते भाजपाच्या वळचणीला येण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. ही चर्चा प्रत्यक्षात आली तरी आता नागरिकांना फारसा धक्का बसण्याची कोणतीही शक्यता नाही, अशीच सद्य:स्थिती आहे. अर्थात कोणाला पक्षात घ्यायचे आणि आपल्या पक्षप्रतिमेचा प्रवास कोणत्या दिशेने होऊ द्यायचा हे सर्वस्वी भाजपालाच ठरवायचे आहे.
या पाश्र्वभूमीवर आता राजधानी नवी दिल्लीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांना पाश्र्वभूमी आहे ती यापूर्वी झालेल्या निवडणुकांची. त्या वेळेस अरिवद केजरीवाल यांच्या आप पक्षाला ७० पैकी २८ जागा मिळाल्या. भाजपाला ३१, तर काँग्रेसला केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले. दिल्ली निवडणुकांमध्ये ‘आप’ने मारलेली मुसंडी ही आजवरचे अनेक राजकीय विक्रम मोडीत काढणारी ठरली. ही मुसंडी एवढी जोरदार होती की, जगभरातील प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेतली. दुसरीकडे लोकसभा निवडणुकांना देश सामोरा जात असतानाच हे सारे घडत होते. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाचे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहिले जात होते. त्या मोदींच्या वारूला आता अरिवद केजरीवाल वेसण घालणार असेच चित्र त्या वेळेस निर्माण झाले. केजरीवालांचा विजय, ‘आप’चा विजय म्हणजे खऱ्या अर्थाने सामान्य जनतेचा विजय असेच चित्र रंगविण्यात आले. केंद्र सरकारला गुडघे टेकायला लावणाऱ्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाची आठवणही अनेकांना त्या वेळेस झाली. पुन्हा एकदा आता देशात तोच माहोल उभा राहणार, असेच चित्र दिसत होते; पण त्याच वेळेस सत्ता जेवढय़ात वेगात आली त्याच वेगात ती घालविण्याचा विक्रमही केजरीवाल यांच्याच नावावर जमा झाला आणि मग सामान्य माणूस निराश झाला. ‘अनाडी का खेलना, खेल का सत्यानाश’ असे भाजपाचे धुरीण नितीन गडकरी यांच्यापासून सर्व जण सांगत होते. ‘आप’ला स्वत:चा झाडू वापरायचा तर काँग्रेसचा हात सोबत लागणारच, असेही गडकरी म्हणाले होते. अधिक सदस्य निवडून आलेले असतानाही सत्ता नाकारण्याचे शहाणपण भाजपाने दाखवले आणि त्याच वेळेस काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेऊन ‘आप’ने मात्र सारे काही गमावले!
राज्याचे सर्वेसर्वा असलेल्या मुख्यमंत्र्यांनीच उपोषणासाठी किंवा आंदोलनासाठी बसण्याचा एक विचित्र पायंडा पाडण्याचा प्रयत्न केजरीवाल यांनी केला, तो मानवला नाही. परिस्थिती हाताबाहेर जात आहे, असे लक्षात आले त्या वेळेस ते राजीनामा देऊन मोकळे झाले. हा सारा भूतकाळ घेऊनच केजरीवाल यांना आता नवी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरावे लागणार आहे. हा भूतकाळ त्यांच्यासाठी तेवढा चांगला नाही, उलटपक्षी त्यांची अपरिपक्वताच उघड करणारा आहे; पण दुसरीकडे आजही नवी दिल्लीमध्ये एक गट असा आहे, जो केजरीवाल यांच्या पाठीशी उभा राहण्याच्या प्रयत्नात आहे. केजरीवाल यांच्या ‘आप’ला एक संधी अजून द्यावी, असे या गटाला वाटते. शिवाय सर्वत्र मोदी आणि भाजपाच आले तर त्यांची अनियंत्रित सत्ता सुरू होईल आणि ते घातक असेल, त्यामुळे त्यांना विरोध करणाऱ्यांना सत्तेत आणून, त्यातही राजधानी दिल्लीत आणून सत्तेचा समतोल साधला जावा, असे वाटणाराही एक गट केजरीवाल यांना दुसरी संधी देण्याच्या विचाराचा आहे, किंबहुना यामुळेच या वेळची निवडणूक तेवढी सोपी नाही हे तर भाजपामधील धुरीणांच्याही लक्षात आले आहे.

राजधानी दिल्लीत ‘आप’ला निवडून देऊन सत्तेचा समतोल साधला जावा, असे वाटणारा एक गट केजरीवाल यांना दुसरी संधी देण्याच्या विचाराचा आहे.

दुसरीकडे भाजपाचीही एक वेगळीच कोंडी झाली आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये नवी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे पाहिले गेले ते डॉ. हर्ष वर्धन आता केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत आणि त्यांच्यानंतर आता ज्याचे नाव पुढे करून निवडणुकांना सामोरे जाता येईल, असा नेता भाजपाकडे नाही. संघाच्या पठडीत तयार झालेले भाजपाचे कार्यकर्ते हे व्यक्तिनिष्ठतेपेक्षा पक्षनिष्ठा मानणारे आहेत, त्यामुळे मुख्यमंत्रिपदी कोण येतो, त्याचे नाव काय आहे, याने भाजपाला आणि कार्यकर्त्यांना फरक पडत नाही, असे सांगितले जाते. ते खरेही असेल, पण जनमानसाला मात्र फरक निश्चितच पडतो.. म्हणूनच तर मोदींचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आधी जाहीर करावे लागले. त्याचाच एक परिणाम होता की, भाजपाला सत्ता मिळाली. त्यानंतर झालेल्या विविध राज्यांच्या निवडणुकांमध्येही भाजपाने मोदींच्याच नावे मतांची बेगमी केली, हे वास्तव आहे. अशा वेळेस पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले. त्यांनी किरण बेदी यांना ‘आप’कडून आपल्याकडे खेचून आणले. यातील मेख अशी की, बेदी यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून ते आपच्या स्थापनेपर्यंत सर्वत्र केजरीवाल यांना साथ दिली. अण्णांना संपूर्ण देश मानत होता तेव्हा त्यांनी अण्णांना, तर नंतर केजरीवाल यांना दंडवत केला. आता देशात मोदीस्तुती गायली जात असताना किरण बेदींनी मोदींना दंडवत घालणे तेवढेच साहजिक होते. शिवाय ‘आय डेअर’ ही त्यांची प्रतिमाही अद्याप देशवासीयांच्या मनात कायम आहे, याचे भाजपाला व्यवस्थित भान आहे. त्यामुळे बेदी यांना भाजपामध्ये घेऊन शहा यांनी केजरीवाल यांच्यासमोर एक नवीन डोकेदुखीच उभी केली आहे. वर्तनामध्ये तर दोघेही एकास एक आहेत. त्यामुळे वादाला तोंड फुटलेच तर परस्पर सारे काही होऊन जाईल, असाही एक होरा यामागे आहेच.
भाजपाकडे मुख्यमंत्रिपदासाठी नसलेला चेहरा, मोदींची पाठराखण केल्यास मिळणारे फायदे या सर्व गोष्टींची गणिते बेदी यांच्यासाठी जुळून आली आहेत. खरे तर त्यांची पावले भाजपाच्या दिशेने पडताहेत याची कल्पना गेल्या काही दिवसांत त्यांनी मोदीस्तुती आळवल्यानंतरच येऊ लागली होती. आता केजरीवाल यांना किरण बेदी आणि भाजपा अशा दोघांचाही सामना करायचा आहे. तिसरा व्यक्तिगत सामना मोदींच्या लोकप्रियतेशीही खेळावा लागणार आहे.
भाजपाने संघात घेतलेल्या बेदींमुळे आता या सामन्यात अधिक रंगत येईल. बेदींची फिरकी केजरीवालांची विकेट घेणार का, हा यक्षप्रश्न आहे. सध्या तरी संघबदल करून भाजपाने बाजी मारल्याचे चित्र असले तरी दिल्ली केजरीवालांचे घरचे मैदान आहे, हे भाजपाला लक्षात ठेवावे लागेल. मोदी लाट खरेच आहे का, याचे उत्तरही ही निवडणूक देईल आणि भाजपा पुढे कोणत्या दिशेने जाणार, याचे उत्तरही याच निकालांमध्ये मिळेल. पुन्हा त्रिशंकू अवस्था आल्यास केजरीवालांची नव्हे तर ती भाजपाची डोकेदुखी ठरेल.. सध्याचे चित्र तरी याच दिशेने जाणारे दिसते आहे. एकूणच या सर्व शक्यता लक्षात घेता भारतीय राजकारणात ‘अब बेदी रंग लाएगी’ असेच दिसते आहे!
01vinayak-signature