lp28यंदा चार्ली चॅप्लीन यांच्या जन्माचे १२५ वे आणि चित्रपट पदापर्णाचे शंभरावे वर्ष. त्यानिमित्त केरळच्या ‘चॅप्लीन इंडिया फोरम’ने जगभरातील व्यंगचित्रकारांच्या चॅप्लीन यांच्यावरील व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवले असून ते सध्या मुंबईत आले आहे.

असे काही कलावंत वा त्यांच्या कलाकृती असतात त्या कधीही काळाच्या पडद्याआड न जाता ‘काळ’च त्यांच्या पाठीमागे उभा असतो. एखाद्या सरकत्या मंचाप्रमाणे काळानुरूप आपले रंग बदलत जणू काही त्या कलाकृतींचा ताजेपणा टिकविण्यासाठीच काळरूपी रंगांची उधळण करीत असतो. अनंतकाळ..!
दर दिवसागणिक त्यांचे सौंदर्य, ताजेपणा, मोहकपणा, प्रत्येक पिढीगणिक त्यांचा आनंद द्विगुणित करीत असते. जसे शेक्सपियरचे साहित्य, मोझार्टचे रागदारी संगीत, लता मंगेशकरांचा धैवत, रविशंकरांची सतार, राजा रवि वर्माची चित्रकारी इ. याच चौकटीत बसणारे जागतिक प्रसिद्ध नाव- चार्ली स्पेन्सर चॅप्लीन म्हणजेच चार्ली चॅप्लीन.
चार्ली चॅप्लीन यांचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी लंडनमध्ये एका सामान्य गरीब परंतु संगीताच्या सुरावटीत खेळणाऱ्या आईवडिलांच्या पोटी झाली. त्यांच्या वडिलांचे नाव चार्ली चॅप्लीन सिनियर व आईचे नाव हॅना चॅप्लीन. ती दोघेही मनोरंजनासाठी संगीताचा वापर करणाऱ्या एका हॉलमध्ये आपल्या संगीताने लोकांचे मनोरंजन करीत.
चॅप्लीन यांचे बालपण अतिशय काबाडकष्ट करण्यात गेले. वर्तमानपत्र टाकण्याचे काम, छापखाण्यात नोकरी, बाहुल्या बनवणे, काचेच्या वस्तूंना वेगवेगळे आकार देण्यासाठी नळीने फुंकर मारणे अशी कामे करीत असतानाही त्याने आपली अभिनेता बनण्याची दुर्दम्य इच्छा कधीही काळाच्या पडद्याआड जाऊ दिली नाही.
दहा वर्षांचा असताना एका नृत्यसमूहामध्ये तो सामील झाला आणि दरमजल करता करता २५ व्या वर्षी त्याने चित्रपटात पदार्पण केले. त्या चित्रपटाचे नाव होते ‘मेकिंग अ लिव्हिंग.’ तो मूकपटाचा जमाना होता. व्यक्तींमधील समर्पक हालचाली, चेहऱ्यावरील अचूक हावभाव व यामधूनच प्रेक्षकांशी परिणामकारक संवाद साधला जाण्याचे ते दिवस होते. चार्ली चॅप्लीन यांचे लाजाळूपणा असलेले स्मितहास्य त्यांचे खणखण्ीत नाणे बनले आणि त्यांच्या पेहरावाने तर जगाला वेड लावले तो पेहराव त्यांनी प्रथमत: ‘द लिटील ट्रॅम्प’ या चित्रपटासाठी वापरला. ढगळी विजार, त्यावर शर्ट व टाय रुंद असा, कोट अगदी शरीराला चोपून बसवल्यासारखा, पुढच्या बाजूने तोकडा व मागच्या बाजूनं लांबूडका. डोक्यावर हॅट आणि हातामध्ये बारीकशी काठी. डोक्यावरील कुरळे केस आणि ओठावर लहानशी हिटलर टाईप मिशी. पायामध्ये लांबूडके बूट असे हे ध्यान लोकांनी अक्षरश: उचलून धरले आणि तोच पेहराव त्यांचा ‘ट्रेड मार्क’ बनला. आज अनेक वर्षांनंतरही चार्ली चॅप्लीन हे नाव कानावर पडताच कुणाच्याही चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटते.
ते स्वत: ‘ऑल इन वन्’ होते. निर्माते, नट, लेखक, दिग्दर्शक आणि स्वत:च्या चित्रपटांसाठी स्वत:च संगीत तयार करायचे. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. द लिटील ट्रॅम्प, द किड, दी गोल्ड रश, लाइम लाइट, सिटी लाइट, सर्कस, द ग्रेट डिक्टेटर वगैरे.
एकदा चित्रपटाचा सेट लागल्यावर ज्याप्रमाणे परिस्थिती येईल त्याप्रमाणे उत्स्फूर्तपणे डायलॉगची अ‍ॅक्शन केली जायची. त्यांनी संपूर्ण फिल्म कधीही लिहिली नाही. उत्स्फूर्तपणा हाच त्यांचा स्थायीभाव होता.
चॅप्लीन एक परफेक्शनिस्ट होते. एका फिल्मसाठी पिंजऱ्यातील सिंहाबरोबर काम करताना त्यांनी २०० वेळा ‘टेक’ घेतले. त्यासाठी ते प्रत्यक्ष स्वत: सिंहाच्या पिंजऱ्यात अनेक वेळा गेले.
दुसरे, वैशिष्टय़ म्हणजे त्यांचे लाजाळू, अबोल असे स्मितहास्य. संपूर्ण चित्रपटभर हास्याचे फवारे उडाले पाहिजेत असा त्यांचा अट्टहास होता. त्याप्रमाणेच ते इतरांकडून कामे करून घ्यायचे.
तिसरे वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी संपूर्ण चित्रपटामधून राजकीय व सामाजिक जीवनावर टीकेचे फटकारे ओढले होते. मग त्यासाठी त्यांनी आपण या क्षेत्रातून हद्दपार झालो तरी हरकत नाही या भूमिकेतून चित्रपट निर्मिती केली. याचे बोलके उदाहरण म्हणजे ‘दी ग्रेट डिक्टेटर’ हा चित्रपट. म्हणजेच ते एक प्रकारे व्यंगचित्र करायचेही काम करीत होते. त्यांच्या चित्रपटात जशी सामाजिक बांधीलकी होती तशीच प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालण्याची लाजबाब अशी कलाही होती. लोकांच्या भावनेला हात घालून ते लोक त्या चित्रपटात कधी मिसळून गेले हे त्यांनाही कळत नसे एवढे त्यांचे चित्रपट भावनोत्कट प्रसंगाने भरलेले असत. दु:ख आणि आनंद हे गुण त्यांच्या चित्रपटाचे स्थायीभाव होते आणि त्यामधूनच ते योग्य तो संदेश प्रेक्षकांमध्ये पोहोचवीत.
त्यांच्या जीवनात अनेक वाईट प्रसंग आले. कौटुंबिक जीवनात ते सुखी नव्हते. त्यांनी अनेक लग्ने केली. त्यांना १२ मुलेही झाली. परंतु आपल्या ‘त्या’ हास्यामुळे आपले दु:ख त्यांनी कधीही ओठांवर आणले नाही.
त्यांच्या त्या विशिष्ट पेहरावाची व अभिनयाची अनेकांनी जगभर ‘कॉपी’ केली व आपले जीवन समृद्ध करून घेतले. आपल्याकडे राज कपूर यांचा ‘मेरा नाम जोकर’ हे त्याचे जिवंत उदाहरण.
अशा या जगप्रसिद्ध विनोदी नटाच्या जन्माचे १२५ वर्ष व त्यांच्या चित्रपटाच्या पदापर्णाचे शंभरावे वर्ष जगभर साजरे केले जात आहे. त्यासाठी केरळच्या ‘चॅप्लीन इंडिया फोरम’ची स्थापना केली असून त्यासाठी चॅप्लीनच्या जीवनावर आधारित ते अनेक कार्यक्रम करीत आहेत. त्यासाठी भारतामधील व परदेशातील अनेक व्यंगचित्रकारांकडून चार्ली चॅप्लीन यांची कॅरिकेचर्स व व्यंगचित्रे तयार करून घेतली व त्यांचे प्रदर्शन मुंबई येथील एनसीपीएच्या गॅलरीत भरविण्यात आले आहे. त्यामध्ये २०० व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे प्रदर्शित केली आहेत.
एकाच वेळी २०० व्यंगचित्रकारांच्या कलेचा आस्वाद घेण्याचे भाग्य प्रेक्षकांना मिळाले आहे. प्रत्येक व्यंगचित्रकाराच्या चित्रकारीची वेगवेगळी वैशिष्टय़े आहेत. या व्यंगचित्रकारांनी ब्रश, पेन आणि इंक, कॉम्प्युटर, पेस्टल कलर वगैरे माध्यमे वापरून व्यंगचित्रे तयार केली आहेत. प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असून त्या दिलखेचक आहेत व त्या पाहून आपल्या ओठाच्या रेषा सहज रुंदावतात. काही व्यंगचित्रे पाहून ‘वाह’ असे सहज उद्गार निघतात.
या प्रदर्शनात स्त्रिया आणि मुलांनी रेखाटलेली २८ व्यंगचित्रे आहेत. मुलांनी चितारलेली कॅरिकेचर्स चांगली आहेत, तसेच स्त्रियांचाही कॅरिकेचर चितारण्यात वरचष्मा दिसून येतो. ऑस्ट्रिया, चीन, रशिया, इजिप्त, इराक, रोम वगैरे देशांतील कॅरिकेचर व व्यंगचित्रे इथे मांडण्यात आली आहेत. त्यातील वेसन खलील – इजिप्त, झ्यू झुजून – चीन, होरिया क्रीसन व बॉग्डॅन पेट्री -रुमानिया, चेर्निशेव नीक -रशिया यांची व्यंगचित्रे उल्लेखनीय वाटतात.
भारतीय व्यंगचित्रे – कॅरिकेचर बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण, केशव, पुन्नप्पा, शंकर पिल्ले, उन्नी, नागनाथ, रोहनित पोरे, मनोज कुरील, मनोज सिन्हा, प्रसन्न अन्किड, मृत्युंजय, प्रभाकर वाईरकर, प्रशांत कुलकर्णी, हरिकुंभार, नरसिंह, थॉमस अ‍ॅन्थनी, बग्गा वगैरे व्यंगचित्रकारांची कॅरिकेचर व व्यंगचित्रे प्रदर्शित केली असून ती उल्लेखनीय वाटतात. झ्यू झीजू -चीन व प्रसन्न अन्किड -भारत यांची व्यंगचित्रे मला विशेष वाटली. रेतिश के. आर. यांनी कॉम्पुटरचा वापर करून तयार केलेले कॅरिकेचर उत्तमच.
‘चॅप्लीन इंडिया फोरम’ची स्थापना फिल्म दिग्दर्शक आर. सरथ व व्यंगचित्रकार सुधीर नाथ यांनी केली असून सदर प्रदर्शन यशस्वी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
सदर प्रदर्शनासंबंधी बोलताना आर. सरथ म्हणाले चॅर्ली चॅप्लीन यांच्या १२५वे जयंती वर्ष असून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचे शंभरावे वर्ष २०१५ आहे. जगभर त्यांच्यावर अनेक कार्यक्रम आयोजित केले जात असून भारतामधूनही आपला काही हातभार लावावा याच हेतूने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. तसेच भारताबाहेरही हे प्रदर्शन व ‘बुद्ध आणि चॅर्ली चॅप्लीन’ हा चित्रपट सरथ यांनी केला असून तोही या प्रदर्शनाबरोबर दाखविला जाणार आहे. भारतामधील महत्त्वाच्या शहरांमध्ये सदर प्रदर्शन प्रदर्शित केले जाणार असल्याचे सुधीर नाथ यांनी या प्रसंगी जाहीर केले.
चित्रपटनिर्मितीचे तंत्रज्ञान फारसे प्रगत झालेले नसतानाच्या, चित्रपट पडद्यावर बोलत नसतानाच्या आणि चित्रपट अजूनही रंगीत झालेला नसतानाच्या काळात चार्ली चॅप्लीन यांनी जी निर्मिती केली तिला आजच्या रंगीत युगातही तोड नाही. एका नाटकातून स्वत:च्या अभिनयाची सुरुवात करून एक यशस्वी चित्रपट निर्माता, नट, दिग्दर्शक बनला आणि ध्रुवताऱ्याप्रमाणे आजही चित्रपटसृष्टीला मार्गदर्शक ठरला.
प्रभाकर वाईरकर response.lokprabha@expressindia.com