गेले महिनाभर सुरू असलेली विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. इतरांना पार करीत यंदाच्या विश्वचषकावर कोणता देश आपले नाव कोरतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील यंदाचे दावेदार असलेले ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व भारत यांनी अपेक्षेप्रमाणेच उपांत्य फेरीत स्थान मिळविले. साखळी गटात झालेल्या काही रंगतदार लढतींच्या पाश्र्वभूमीवर उपांत्यपूर्व फेरीचे सामने चुरशीने होतील, अशी अपेक्षा होती; मात्र या चारही सामन्यांत एकतर्फीच लढती पाहावयास मिळाल्या. त्यामुळे हे सामने पाहणाऱ्या कोटय़वधी चाहत्यांची सपशेल निराशा झाली. त्यांचे मनोरंजन झालेच नाही. निदान आता उपांत्य फेरीत विलक्षण झुंज पाहावयास मिळेल, अशी अपेक्षा आहे.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व भारत या संघांनी अतिशय सांघिक कौशल्य आणि सातत्यपूर्ण कामगिरीचा प्रत्यय घडवीत आपले वर्चस्व राखले. सांघिक कामगिरीचा अभाव असलेले व ‘मॉब’ विभागातील पाकिस्तान, वेस्ट इंडिज व बांगलादेश हे संघ स्पर्धेतून बाहेर पडले हे प्रेक्षकांसाठी चांगलेच झाले. श्रीलंकेने साखळी सामन्यांमध्ये जे तडाखेबाज विजय मिळविले होते, त्या पाश्र्वभूमीवर त्यांनी बाद फेरीत सपशेल नांगी टाकली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेबाबत खूप बाऊ केला हेच सिद्ध झाले. आर्यलडसारखा चांगली क्षमता असलेला संघ बाद फेरीत स्थान मिळवू शकला नाही हे क्रिकेट चाहत्यांसाठी दुर्दैवच म्हणावे लागेल. उदयोन्मुख संघांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचेच तंत्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अवलंबले आहे. स्पर्धेतील सामन्यांची यंदाची कार्यक्रमपत्रिका (स्वरूप व ड्रॉ) खूपच खराब दर्जाची होती. मर्जीतील काही संघांचे हित जपताना त्यांनी अन्य संघांवर अन्यायच केला आहे. फुटबॉलच्या व्यापक विश्वचषकाचे स्वरूप लक्षात घेऊन आयसीसीने क्रिकेट खेळाचा खऱ्या अर्थाने विस्तार कसा होईल याचा विचार केला पाहिजे.
साखळी सामन्यांप्रमाणेच बाद फेरीतील सामन्यांमध्येही पंचांचे अनेक निर्णय वादग्रस्त व टीकात्मक ठरले. बांगलादेश व भारत यांच्यातील सामन्यातील काही निर्णयांबाबत खूपच ऊहापोह झाला आहे. रोहित शर्माच्या झेलबाबत पंचांनी घाईघाईने नोबॉल दिला. त्या वेळी पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेऊन निर्णय घेतला असता तर एवढी टीका झाली नसती. खरंतर आता सामन्यांबाबत एवढे तंत्रज्ञान विकसित झाले आहे की मैदानावरील पंचांचे प्रत्यक्ष काम दहा टक्केच राहिलेले असते व ९० टक्के काम तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केले जात असते. असे असूनही पंचांची कामगिरी सदोष होत असेल तर आयसीसीने खरोखरच पंचांच्या कामगिरीचा आढावा घेतला पाहिजे व त्यांचे ज्ञान अद्ययावत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
या स्पर्धेतील आतापर्यंत झालेल्या सामन्यांवरून असे लक्षात येते की यंदा गोलंदाजांवर सपशेल अन्याय झाला आहे. फलंदाजीस अनुकूल खेळपट्टय़ा, मैदानावर क्षेत्ररक्षणाबाबत असलेली बंधने हे लक्षात घेता गोलंदाजांचे खच्चीकरणच करण्याचा प्रयत्न झाला आहे. क्षेत्ररक्षणाबाबत बंधने ठेवली नाहीत तर आपोआपच फटके मारताना फलंदाजांचे कौशल्य सिद्ध होईल. क्रिकेट चाहत्यांना फटकेबाजीबरोबरच गोलंदाजांच्या कामगिरीबाबतही उत्सुकता असते, हे आयसीसीने लक्षात घेतले पाहिजे. आयसीसीच्या नियमावली व स्पर्धा समितीवर अनेक श्रेष्ठ गोलंदाज असूनही ते या गोष्टींकडे कानाडोळा कसे करतात याचेच आश्चर्य वाटते.
बांगलादेशविरुद्ध रोहित शर्माने शतकी खेळी केली असली तरी मी अजूनही त्याच्या कामगिरीबाबत समाधानी नाही. त्याने या स्पर्धेत कमकुवत संघांविरुद्धच अव्वल खेळ केला आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचे कौशल्य सिद्ध होईल. सुरेश रैनाने आपण परिपक्व खेळाडू असल्याचे दाखवून दिले. विराट कोहली अद्याप जमिनीवर आलेला दिसत नाही. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वाइड बॉलवर त्याने चक्क विकेट फेकली. उपांत्य फेरीत अशी चूक त्याने करू नये, हीच अपेक्षा. अजिंक्य रहाणेला अजूनही बरेच शिकायाचे आहे. महत्त्वाच्या सामन्यांबाबत त्याने परिपक्वता दाखविली पाहिजे. रवींद्र जडेजाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू खेळ करताना आपले या स्पर्धेतील अस्तित्व दाखवून दिले.
भारतीय द्रुतगती गोलंदाजांनी खरोखरच कमाल केली आहे. स्पर्धेपूर्वीच्या कामगिरीच्या तुलनेत त्यांनी दिमाखदार व अपेक्षा उंचावणारी कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली फलंदाजी मिळाली तर २५० धावादेखील आव्हानात्मक होतील. बांगलादेशचा फलंदाज तमिम इक्बाल हा झेलबाद असताना भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने अपीलच केले नाही. अशी चूक त्याने कांगारूंविरुद्ध करू नये. हा सामना सिडने येथे होणार आहे. तेथील खेळपट्टी आतापर्यंत फलंदाजी व फिरकी गोलंदाजीस अनुकूल राहिली आहे. त्यामुळे आपल्या फलंदाजांनी पन्नास षटके खेळून काढली तर आपण विजय मिळवू शकतो. आपल्यापेक्षा ऑस्ट्रेलियावर जास्त दडपण राहणार आहे. घरच्या मैदानावर ते खेळत आहेत. सलग तीन वेळा विश्वविजेतेपद त्यांनी मिळविल्यामुळे त्यांच्यासाठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची राहणार आहे. स्टेडियमवर निम्म्यांहून जास्त प्रेक्षक भारतीय असतील. त्याचेही दडपण त्यांच्यावर असेल.
उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानच्या गोलंदाजांनी विशेषत: वहाब रियाझने ऑस्ट्रेलियास बुडबुडे आणले होते. जर आणखी २०-२५ धावा असत्या तर कदाचित सामन्याचा निकाल ऑसीविरुद्ध गेला असता. एक दिवसाच्या चारशे सामन्यांचा अनुभव आपल्याकडे आहे हे शाहिद आफ्रिदीच्या कामगिरीत कधीही दिसले नाही. संपूर्ण स्पर्धेत तो अपयशी ठरला आहे. आफ्रिदीला वगळण्याचे धाडस त्यांचा कर्णधार मिसबाह उल हक करू शकला नाही याहून अन्य दुर्दैव कोणते? युनूस खानसारख्या अनुभवी फलंदाजास प्रत्येक सामन्यात खेळविले असते तर या स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी चांगली झाली असती. जमावातील काही जण दगडफेक करीत असतात, तशीच वृत्ती पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये दिसून येते. त्यांच्या संघात सांघिक कौशल्याचा अभावच दिसला आहे. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हा खरोखरच लक्षात राहावा असाच गोलंदाज आहे. त्याच्या कामगिरीने त्याचा सहकारी मिचेल जॉन्सन याची कामगिरी झाकोळली गेली आहे. शेन वॉटसन या वरिष्ठ खेळाडूने अनेक वेळा संघास तारून नेण्याची कामगिरी केली आहे. ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मायकेल क्लार्क हे आपल्याविरुद्ध नेहमीच यशस्वी होतात. एखाद्या खेळाडूला सूर सापडत नसेल तर आपल्याविरुद्ध खेळताना त्याला सूर सापडण्यास आपलेच खेळाडू मदत करतात, असा आजर्पयचा अनुभव आहे. कांगारूंकडे खोलवर फलंदाजी आहे. त्यांच्यावर नियंत्रण राहण्याची जबाबदारी आपल्या रैना, अश्विन, जडेजा यांच्यावर आहे.
न्यूझीलंडच्या कामगिरीने सर्वानाच मोहित केले आहे. सातत्यपूर्ण कामगिरी कशी करावयाची आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. एखादा मातब्बर फलंदाज अपयशी ठरला तर दुसरा खेळाडू त्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो, असेच दिसून आले आहे. मार्टिन गुप्तिल याने केलेले नाबाद द्विशतक हे त्याचेच द्योतक आहे. सलामीस येऊन अखेरच्या चेंडूपर्यंत नाबाद राहणे ही काही सोपी कामगिरी नाही. सर्वच आघाडय़ांवर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण व लक्षणीय यश मिळविले आहे. टिम साउथी, ट्रेन्ट बोल्ट, कोरी अँडरसन, अँडी मिलने यांच्यासह सर्वच वेगवान गोलंदाज अतिशय फॉर्ममध्ये आहेत. डॅनियल व्हेटोरी हा प्रौढ फिरकी गोलंदाजही त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे हे त्याने सिद्ध केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा त्यांना लाभ होईल.
आफ्रिकेकडे असलेला अब्राहम डिव्हिलियर्स हा घटक खूपच महत्त्वाचा आहे. त्याच्या एकटय़ाच्या जीवावर संघ अवलंबून आहे. अर्थात त्यांच्या संघात असलेले हाशिम अमला, डेव्हिड मिलर, जीन पॉल डय़ुमिनी यांना दुर्लक्षित करणे अयोग्य होईल. डेल स्टेन, मोर्न मोर्कल यांच्या वेगवान माऱ्यास न्यूझीलंडचे फलंदाज कसे सामोरे जाणार याचीच उत्सुकता आहे.
वेस्ट इंडिजचा संघ बाद होणार हे स्पष्टच होते. त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध ३० षटकांत २५० धावा केल्या तरीही गुप्तिल याने नाबाद २३७ धावा करीत अगोदरच त्यांच्या संघाचा दुबळेपणा दाखवून दिला होता. ख्रिस गेल हा भरवशाचा फलंदाज नाही हे गेलने स्वत:च्या कर्माने सिद्ध केले आहे. संघातील खेळाडू वैयक्तिक कामगिरीवर भर देतात हे विंडीजच्या खेळाडूंनी दाखवून दिले. श्रीलंकेने आफ्रिकेविरुद्ध विनाकारण दडपण घेतले. विशेषत: कुमार संगकारा खूपच तणावाखाली खेळला. त्यामुळेच त्यांच्या संघाची कामगिरी खराब झाली. त्याला एकीकडे जखडवून ठेवीत दुसऱ्या बाजूने विकेट्स काढण्याच्या तंत्रात आफ्रिकेचे गोलंदाज माहिर ठरले. संगकारा व माहेला जयवर्धने यांची अनुपस्थिती वनडे क्रिकेटमध्ये जाणवणार आहे.
ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. चाहत्यांना अव्वल दर्जाचा खेळ पाहावयास मिळणार आहे. भारताने विश्वचषक आपल्याकडे ठेवावा अशी तमाम भारतीय चाहत्यांची अपेक्षा आहे. ती फलित होवो.
सुलक्षण कुलकर्णी