समोर बसलेल्या श्रोत्यांसमोर ओघवत्या भाषेत, आपलं म्हणणं ठासून, ठामपणे मांडणाऱ्या महाराष्ट्रातल्या आजच्या पिढीतल्या वक्त्याचा शोध घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ या स्पर्धेचा वृत्तान्त!

व्यक्त होणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. ‘फ्रीडम ऑफ स्पीच’ या अधिकारांतर्गत प्रत्येकाला जे वाटतं ते तो बोलू शकतो. सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, राजकीय अशा अनेक विषयांमधील घटनांबाबत तो त्याचं मत व्यक्त करतो. या व्यक्त होण्यावर कसलेच र्निबध नाहीत. पण, या व्यक्त होण्यामध्ये एक सुसूत्रता असली की त्या व्यक्त होण्याला चार चांद लागलेच म्हणून समजा. ही सुसूत्रता येणं म्हणजे एखाद्याचं वक्तृत्व. शाळेत असल्यापासून अनेकांनी ‘वक्तृत्व’ हा शब्द ऐकला असेल. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांची जयंती असो किंवा १५ ऑगस्ट, २६ जानेवारीसारखं निमित्त असो. त्या त्या दिवशीच्या वैशिष्टय़ांनुसार शाळा-शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं जायचं. या तारखा जवळ आल्या की, वर्गातले अनेकजण आपली भाषणं लिहून पाठांतराला लागायचे. शाळेत असताना दिलेल्या विषयाचं त्या त्या वयानुसार विचारमंथन व्हायचं. ती भाषणं चाकोरीबद्ध असायची. भाषणाला मर्यादा असायच्या. स्वत:ची मतं मांडण्याइतकी प्रगल्भता त्या वयात नसायची. पण, पुढे कॉलेजांमध्ये गेल्यानंतर या विचारांना फाटे फुटू लागतात. आणि एकाच वेळी एकाच विषयाबाबत वेगवेगळ्या कोनांतून विचार करायला सुरुवात होते. त्यामुळे कॉलेजमध्ये होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धा काहीशा एक पाऊल पुढे जातात. अशीच एक वक्तृत्व स्पर्धा ‘लोकसत्ता’ने आयोजित केली होती. नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धे’ची अंतिम फेरी गेल्या आठवडय़ात विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघात दिमाखात पार पडली. स्पर्धेला जनकल्याण सहकारी बँक आणि तन्वी हर्बल्स यांचेही मोलाचे साहाय्य लाभले. महाविद्यालयीन तरुणांच्या कलेला प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा ठरली. कार्यक्रमाची शोभा वाढली ती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या येण्याने. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेते सचिन खेडेकर, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनीही उपस्थिती दर्शविली.
महाराष्ट्रभरातून आठ विभागांमध्ये अंतिम फेरीची चुरस दिसून येत होती. स्पर्धा सुरू होण्याआधी प्रत्येक स्पर्धक आपापली भाषणं मनोमन आठवत होता. आपले मुद्दे बरोबर आहेत ना, ते आपण योग्य प्रकारे मांडतोय का, बोलताना अडखळत तर नाहीयोत ना असे नानाविध प्रश्न ते स्वत:च्याच मनाशी विचारत होते. सभागृह खच्चून भरलं होतं. इतक्या गर्दीपुढे आपल्याला भाषण करायचंय म्हणून अधेमधे त्या गर्दीकडे कटाक्ष टाकत होते. स्पर्धकांच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन, काळजी, उत्सुकता, आत्मविश्वास असं सारं काही झळकत होतं. त्यातच बाबासाहेब पुरंदरे स्पर्धेसाठी विशेष अतिथी म्हणून येणार असल्याने काहीसं दडपणही जाणवत होतं. अखेर स्पर्धेला सुरुवात झाली. प्रत्येक स्पर्धक आपापला कोड क्रमांक आणि विषय सांगत भाषणाला सुरुवात करत होते.
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, रत्नागिरी, अहमदनगर, औरंगाबाद अशा आठ विभागांमधून एकूण नऊ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. विषयांमध्ये वैविध्य असल्यामुळे वेगवेगळ्या विचारसरणीचे स्पर्धक दिसून आले. ‘ल.. लग्नाचा की लिव्ह इन चा’सारखा विवाहाचा विषय असो किंवा ‘धर्म.. राँग नंबर?’ असा धार्मिक रूढी, परंपरांचा लेखाजोखा मांडणारा विषय असो; ‘बॉलीवूड हॉलीवूडसारखं का नाही?’ असा मनोरंजानाचा विषय असो, स्पर्धक आत्मविश्वासाने आपले विचार मांडत होते. धर्मापासून ते मराठीपणाच्या नेतृत्वापर्यंत आणि ‘आप’च्या विजयापासून नेमाडे-रश्दी वादापर्यंत विविध विषयांवर मते मांडत ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ची अंतिम फेरी मुंबईत रंगली.
राज्यातील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांमधून महाराष्ट्राचा ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ हा किताब मिळविण्याचा बहुमान पटकावला तो पुण्याच्या नेहा देसाई हिने. त्याचबरोबर ती लालित्यपूर्ण वक्तृत्वशैलीसाठी देण्यात येणाऱ्या प्रा. वसंत कुंभोजकर विशेष पुरस्काराचीही मानकरी ठरली. नागपूरच्या शुभांगी ओक हिने दुसरे, तर नाशिकच्या काजल बोरस्ते हिने तिसरे पारितोषिक पटकावले. एकंदर महाराष्ट्राच्या कन्यांनीच या स्पर्धेवर आपली छाप उमटवली. रत्नागिरीच्या आदित्य कुलकर्णीला उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यातील आठ केंद्रांमधून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या आकांक्षा चिंचोलकर (औरंगाबाद), रिद्धी म्हात्रे (ठाणे), रसिका चिंचोळे (नागपूर), आदित्य कुलकर्णी (रत्नागिरी), श्रेयस मेहंदळे (मुंबई), कविता देवढे (अहमदनगर), शुभांगी ओक (नागपूर), नेहा देसाई (पुणे) आणि काजल बोरस्ते (नाशिक) या नऊ वक्त्यांनी धर्म, लिव्ह इन रिलेशनशिप, ‘आप’चा विजय येथपासून नेमाडे-रश्दी वादापर्यंत विविध विषयांवर आपली मते मांडली.
स्पर्धेची सुरुवात औरंगाबाद विभागातून महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या आकांक्षा चिंचोलकर हिच्या भाषणाने झाली. तिने ‘धर्म. राँग नंबर?’ हा विषय मांडला. धर्म ही पवित्र गोष्ट आहे, हे सांगताना तिने स्वामी विवेकानंदांच्या ओळींचा दाखला दिला. धर्माच्या नावाखाली झालेली युद्धे, जमिनींची फाळणी, शिक्षणापासून वंचित राहिलेले अनेक लोक असे मुद्दे तिने मांडले. तिच्या भाषणाला प्रेक्षक उत्स्फूर्त दाद देत होते. सध्याची तरुणाई प्रॅक्टिकल विचारांची आहे, असं सगळे म्हणतात. कॉलेज निवडण्यापासून ते करिअर सेट करेपर्यंतचे सगळे निर्णय ते घेतात. करिअर मार्गाला लागलं की मुद्दा येतो तो लग्नाचा. याही विषयांत त्यांच्या विचारांची स्पष्टता अनेकदा जाणवते. कमिटमेंट या शब्दाला घाबरणारे काही तरुण लग्नापेक्षा लिव्ह इनचाच मार्ग अवलंबतात. हा विषय तरुणाईमध्ये नेहमी चर्चेला असतोच. ठाणे विभागातून सवरेत्कृष्ट ठरलेल्या रिद्धी म्हात्रे हिने याच मुद्दय़ाचा ‘ल.. लग्नाचा की लिव्ह इनचा’ हा विषय मांडला. भाषणाच्या सुरुवातीला विषयाला अनुसरून मंगलाष्टकंही म्हटली. याचबरोबर काही कवितांच्या मदतीने तिने हा विषय खुलवला. आजची स्त्री सुरक्षित नाही, आजची स्त्री स्वतंत्र विचार करणारी आहे, स्त्रीशिक्षण असे अनेक मुद्दे स्त्रीभोवती सतत फिरतात. स्त्री-मुक्ती हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. मात्र आज २१ व्या शतकात स्त्री-मुक्ती या विषयाकडे आजची तरुणाई कशी बघते याचं प्रत्यंतर नागपूर विभागातून महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या रसिका चिंचोळे हिच्या भाषणातून आला.

lp19ही पहिली पायरी
आजच्या तरुणांबद्दल नकारात्मक बोलले जाते. पण, ‘लोकसत्ता’ वक्तृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरीतल्या नऊही स्पर्धकांनी आपल्या वक्तृत्वातून ते खोटं ठरवलं आहे. विषय साधे असले तरी ते अनेकांसमोर मांडताना त्याची वैचारिक मांडणी उत्तमरीत्या करावीच लागते. तेच नेमकं या स्पर्धकांनी करून दाखवलं. वक्ता हा नट आणि खेळाडू अशा दोन्ही भूमिकांमधला असावा. बोलताना कुठे थांबावं, आवाजाचा चढउतार, देहबोली अशा सगळ्याच बाबतीत वक्त्याने जागरूक असणं गरजेचं असतं. सगळ्या स्पर्धकांमध्ये आत्मविश्वास असल्याचं जाणवलं. ही स्पर्धा म्हणजे उत्तम वक्ता होण्याच्या प्रवासातली पहिली पायरी आहे असं प्रत्येक स्पर्धकाने समजावं.
विजय तापस, प्राध्यापक

lp20‘लोकसत्ता’चं अभिनंदन
अलीकडे ‘बरं बोलणं’च कमी होत चाललंय. तर याउलट काही वेळा अनेकांचं बोलणं हे कृत्रिम आणि नाटकी वाटतं. या सगळ्या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’ने वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करणं हे कौतुकास्पद आहे. त्यासाठी ‘लोकसत्ता’चं अभिनंदन. स्पर्धकांना दिलेले सगळेच विषय आव्हानात्मक होते. त्यामुळे त्याचा अभ्यास करणं गरजेचंच होतं. काही स्पर्धकांना विषयाचा आवाका कळलेला नव्हता. मुळात कोणताही विषय मांडताना विचारांची स्पष्टता हवी. ती नसेल तर मात्र मांडणीत गोंधळ उडतो. म्हणूनच विषयाचा खोलवर जाऊन अभ्यास करणं महत्त्वाचं असतं. या स्पर्धेतल्या सगळ्याच स्पर्धकांचा आत्मविश्वास उल्लेखनीय होता. बोलताना वक्त्याने देहबोलीकडेही विशेष लक्ष दिलं पाहिजे. तसंच त्याला आजूबाजूच्या घटनांची माहिती असायला हवी.
सुधीर गाडगीळ, मुलाखतकार

lp21० महाराष्ट्रातून वेगवेगळ्या विभागांमधून निवडलेल्या स्पर्धकांमध्ये मला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं याचा मला आनंदच आहे. खरंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्याचाच मला जास्त आनंद आहे. त्यामुळे माझं भाषणं चांगलं कसं होईल याकडेच माझं जास्त लक्ष होतं. पहिल्यांदाच मला माझ्या शैलीबद्दलही गौरविण्यात आलं. त्यामुळे त्याचा विशेष आनंद वाटतो.
– नेहा देसाई, पुणे (प्रथम पारितोषिक आणि लालित्यपूर्ण शैलीसाठीचं प्रा. वसंत कुंभोजकर पारितोषिक विजेती)

lp22० ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा’ आम्हा स्पर्धकांना बरंच काही शिकवून गेली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींकडून मोलाचं मार्गदर्शनही मिळालं. स्पर्धेत मांडल्या गेलेल्या इतर स्पर्धकांचे विषय, विचार, शैली या सगळ्याचा आयुष्यात पुढे उपयोग होणार अशी मला खात्री वाटते. या स्पर्धेच्या निमित्ताने मिळालेल्या शिकवणीबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार.
– शुभांगी ओक, नागपूर
(द्वितीय पारितोषिक विजेती)

lp23० आमच्यासारख्या उद्याच्या नव्या दमाच्या वक्त्यांसाठी ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा’ खूप उपयोगाची ठरली. इतर स्पर्धकांना मिळालेले विषय उत्तम होते. तसंच बुद्धीला चालना देणारे होते. मीही माझ्या विषयाचा चहूबाजूंनी अभ्यास केला होता. त्यामुळे स्पर्धा चुरशीची ठरली.
– काजल बोरस्ते, नाशिक
(तृतीय पारितोषिक विजेती)

lp24० मी अंतिम फेरीपर्यंत आलो हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. या स्पर्धेमुळे आम्हाला आमचे वक्तृत्व सादर करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार. या स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसामुळे पुढच्या स्पर्धाना अधिक जोमाने तयारी करण्याची प्रेरणा मिळाली. तसंच आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोनही मिळाला.
– आदित्य कुलकर्णी, रत्नागिरी
(उत्तेजनार्थ पारितोषिक विजेता)

सध्या एका विषयाचा जबरदस्त बोलबाला आहे. तो म्हणजे ‘आप’चा विजय. राजधानीतून निवडून यायचं. मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायची. लगेचच राजीनामाही द्यायचा. मग पुन्हा निवडून यायचं. आणि पुन्हा शपथ घेण्यासाठी सज्ज व्हायचं. हा गेल्या एका वर्षांतला ‘आम आदमी पार्टी’ अर्थात ‘आप’ या पक्षाचा 

lp18घटनाक्रम. गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीला अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आणि या वर्षी १४ फेब्रुवारीलाच त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली; हा दाखला देत रत्नागिरी विभागाच्या आदित्य कुलकर्णी या स्पर्धकाने ‘आपच्या विजयाचे वेगळेपण’ हा विषय मांडत श्रोत्यांच्या मनातील भावनांनाही वाचा फोडली. या पक्षाच्या विजयाचे वेगळेपण कसे हे दाखवून देणारी अनेक उदाहरणं त्याने मुद्देसूद मांडली. तो मांडत असलेले मुद्दे प्रेक्षकांना पटत असल्यामुळे त्यांच्याकडून टाळ्यांच्या स्वरूपात त्याच्या भाषणाला दाद मिळत होती. साहित्याच्या क्षेत्राला वाद नवीन नसले, तरी सध्या चाललेल्या ‘नेमाडे-रश्दी’ वादाचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नाही, तर विदेशांतही उमटले. या वादाबाबत आपली भूमिका मुंबई विभागातून पहिल्या आलेल्या श्रेयस मेहंदळे याने मांडली. भाषणाच्या शेवटाकडे येत त्याने नेमाडेंना संबोधत एक कविताही सादर केली. साहित्यप्रेमींची कळकळ, नेमाडेंविषयी असलेलं प्रेम या कवितेतून व्यक्त केलं. तर अहमदनगर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कविता देवढे हिने ‘शाळा काय शिकवते’ या विषयावर आपली मते मांडली. नागपूर विभागातून दोन स्पर्धक महाअंतिम फेरीसाठी निवडण्यात आले होते. त्यापैकी शुभांगी ओक हिने ‘सोशल मीडिया : अभिव्यक्तीचा बहर की कहर?’ हा विषय मांडला. हिनेही अनेक उदाहरणं देत मुद्दे मांडले.
पुणे विभागातून महाअंतिम फेरीत आलेल्या नेहा देसाई हिने ‘नेतृत्व आणि मराठीपण’ या विषयावर बोलताना सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय नेतृत्व या सर्वच पैलूंवर प्रकाश टाकला. कुठे थांबावं, टाळ्या वाजवताना भाषण काही क्षण थांबावं, न अडखळता बोलावं अशा अनेक गोष्टींची जाण तिला असल्यामुळे तिचं भाषण फुललं होतं. योग्य मुद्दय़ांच्या मांडणीसह देहबोली, आवाजाचा चढ-उतार अशा अनेक गोष्टींचं भान ठेवल्यामुळे तिचं भाषण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. आजच्या तरुणाईवर बॉलीवूड आणि हॉलीवूडचा प्रचंड प्रभाव आहे. पण, याच तरुणाईचा अर्धा गट हा हॉलीवूडकडे आकर्षिला जातो. याचं नेमकं कारण काय? मग बॉलीवूड हॉलीवूडसारखं नाही की तसं होऊच शकत नाही? हाच विषय एका स्पर्धकाने खुबीने मांडला. नाशिक विभागाच्या काजल बोरस्ते हिने ‘बॉलीवूड हे हॉलीवूड का नाही?’ या विषयावर आपली मते मांडली. या दोन्ही क्षेत्रांची तुलना करत काजलने आपले मुद्दे मांडले. तसंच हे एकमेकांसारखं का होऊ शकत नाही किंवा होऊही नये यावरही प्रकाश टाकला. महाराष्ट्रातून निवडलेल्या नऊही स्पर्धकांनी वेगवेगळ्या विषयांवर आपापली मते, विचार मुद्देसूद मांडले. विविध विषयांकडे स्पर्धकांचा वेगळा आणि नवा दृष्टिकोन दिसला.
वक्त्याने नट असावं, नाटकी असू नये
उत्तम वाणीने जगभरात सर्वच पिढय़ांपर्यंत शिवचरित्र पोहोचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हेही स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी उपस्थित होते. सगळ्याच स्पर्धकांचे वक्तृत्व बाबासाहेब मनापासून ऐकत होते. सगळ्यांची भाषणं ऐकून झाल्यावर बाबासाहेबांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. प्रेक्षकांना स्पर्धेच्या निकालाइतकीच बाबासाहेबांच्या भाषणाचीही उत्सुकता होती. ‘वक्तृत्व ही एक कला आहे. तो एक परफॉर्मन्स असायला हवा. वक्तृत्वात नाटय़ असावं, पण ते नाटकी वाटू नये. वक्त्याने काहीसं विनोदीही असावं. किमान विनोदी शैलीची जाण असावी. जेणेकरून वक्तृत्वात वेगवेगळ्या छटा देता येतात. वक्त्याला गाता आलं पाहिजे, तो विनोदी हवा, मांडत असलेल्या विषयाचं सखोल ज्ञान हवं. या सगळ्या गोष्टी एखाद्या वक्त्याकडे असल्या तरच त्याचं वक्तृत्व परिपूर्ण होऊ शकतं’, हे महत्त्वाचे मुद्दे त्यांनी सांगितले. वक्त्याने उत्तम श्रोता असणंही महत्त्वाचं आहे; असंही त्यांनी नमूद केलं. तसंच वक्त्याने कधीही श्रोत्यांना गृहीत धरू नये, श्रोतृवर्ग अत्यंत हुशार असतो असा सल्लाही त्यांनी स्पर्धकांना दिला. अनेक दिग्गज मंडळींचे दाखले देत त्यांच्या भाषणात रंगत चढली होती. मुख्यत्वे विनायक दामोदर सावरकर यांचा उल्लेख बाबासाहेब त्यांच्या भाषणात वारंवार करत होते. सावरकरांविषयीची त्यांच्या मनात असलेली आत्मीयता, त्यांची भाषणं ऐकण्याची उत्सुकता, त्यांचे विचार ऐकणं असं सारं काही त्यांच्या भाषणातून स्पष्ट होत होतं. ‘सावरकरांसारखा वक्ता मी आजवर बघितला नाही’ असंही ते स्पष्टपणे कबूल करतात. काही उत्तम वक्त्यांची उदाहरणं देत वक्त्याला बोलताना स्वातंत्र्य द्यावं असंही ते सांगतात. ‘वक्ता अंत:करणाने बोलत असतो. सगळा जीव एकत्र करून तो त्याचे विचार मांडत असतो. अशा वेळी त्याच्या बोलण्यात व्यत्यय आणू नये’, असं ते सांगतात. वक्त्यानेही आपलं बोलणं किती आकर्षक होईल याचं भान ठेवावं. भाषण करताना कसं उभं राहावं, कसं बसावं, बोलण्याची लकब, देहबोली कशी असावी याचीही माहिती त्यांनी दिली.
चैताली जोशी