एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी जाणे म्हणजे प्रवास इतपत मर्यादित अर्थ लावून या ‘हायवे’वर प्रवास करता येणार नाही. कारण हा हायवे जरी नेहमीचा असला तरी त्यावरचा प्रवास हा नेहमीच्या पद्धतीने नाही. हा प्रवास म्हणजे केवळ वाहनांचे चलनवलन नाही तर त्याचबरोबर हा प्रवास तुमच्या-आमच्या मानसिकतेचा वेध घेणारा आहे. स्वत:च स्वत:भोवती निर्माण केलेल्या फुकाच्या कोशांना धक्का लावत, वाटेवरचे अडथळे दूर करत, दृष्टी साफ करत हा प्रवास सुरू असतो. एका क्षणी त्याला ब्रेक लागतो आणि आत्ममग्नतेला थेट आरपार भेदत पुढच्या प्रवासाचे सुतोवाच करतो. उमेश आणि गिरिश कुलकर्णींचा ‘हायवे’ हा असा अनोखा प्रवास करायला लावणारा आहे. तुमच्या-आमच्यासारख्याच चाकोरीतल्या आयुष्यांना उलगडण्यासाठीचा केलेला, चाकोरीबाहेरचा प्रयोग असे म्हणावे लागेल.

रोड मुव्हीज ही संकल्पना परदेशी भरपूर वेगवेगळ्या प्रकारे वापरून झाली आहे. आपल्याकडेदेखील काही सिनेमे आहेत. पण त्यात मनोरंजनाचा मसाला हा महत्त्वाचा घटक असायचा. हायवे त्या वाटेवर जाणारा नाही. कवितेत ज्याप्रमाणे अनेक अव्यक्त भावना दडलेल्या असतात, तसेच येथेदेखील आहे. त्याला कैक पदर आहेत. थोडासा प्रयत्न केला तर या भावना नक्कीच जाणवू शकतात. कारण हे सारंच प्रयोगशीलतेत मोडणारं आहे.

मुंबई-पुणे या अखंड वाहत्या रस्त्यावरील तीस एक प्रवाशांच्या, आयुष्याच्या प्रवासातील असंख्य भावभावनांच्या कोलाजवर या सिनेमाचा प्रवास होतो. अत्यवस्थ वडिलांच्या कायदेशीर वैद्याकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अमेरिकेतून आलेला एक एनआरआय, गाडीला अपघात झाल्यामुळे त्याच्याच गाडीत लिफ्ट घेतलंल पन्नाशीतलं जोडपं, गरोदर पत्नीला घेऊन तिच्या माहेरी घेऊन जाणारा, बदली झाल्यामुळे बिºहाड घेऊन निघालेलं कुटुंब, कोण्या राजकीय पक्षाच्या कार्यक्रमासाठी निघालेली लोकप्रिय मालिकांमधली लोकप्रिय कलाकार, दोन गाड्यांमध्ये तर अध्यात्मापासून जागतिक राजकारणावर भाष्य करणारे नानाविध प्रकारचे प्रवासी नमुने, मूकबधिर मुलाला कौतुकाने शिवनेरीतून नेणारे वडील आणि संशयितांसारखे वावरणारे तिघे. असा हा फौजफाटा घेऊन प्रवासाची सुरुवात होते. तेथेपासून ते घाटात ट्रॅफिक जॅम झाल्यामुळे अडकेपर्यंतच्या प्रवासात या सर्व पात्रांच्या आयुष्यातील विविक्षित क्षण टप्प्याटप्प्याने उलगडत जातात. सगळ्यांची कथानकं भिन्न आहेत. प्रत्येकाच्या उलगडण्याचा बाज वेगळा आहे. एका कथानकात दुसरं कथानक अडकत नसलं तरी त्यातून सूचक भाष्य मात्र नक्कीच होतं. आणि अखेरीस प्रत्येकाला ज्याचा त्याचा अवकाश सापडतो.

प्रयोग म्हणून चित्रपट उत्तम आहे. लोकप्रियतेची कसोटी येथे लावून चालत नाही. कारण सतत चटपटीत मसालेदार पाहण्याची आपल्याला सवय आहे. त्यातच रोडमुव्हीजमध्ये अनेक धमाकेदार गोष्टी पाहिल्या आहेत. तेव्हा असं काही तरी पाहताना थोडंसं विचित्र वाटू शकतं. पण ते पाहायला मात्र हवं. एक उणीव मात्र आवर्जून नमूद करायला हवी ती म्हणजे चित्रपटाची लांबी. अनेक कथांचे मिश्रण असल्यामुळे लांबी वाढलेली असू शकते, पण काही प्रमाणात तरी कमी असायला हवी होती.

कथेची जुळणी हा याचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणता येईल. एकाच मोठ्या कॅनव्हासवर मानवी भावभावनांना थेट हात घालणाºया अनेक कथा मांडत त्याची एकसंध कथा करावी असंच काहीसं येथे आहे. अर्थातच अशा वेगळ्या प्रयोगाला सर्वच कलाकारांनी अगदी उत्तम प्रतिसाद देत जीव ओतून कामं केली आहे. आत्ममग्नतेच्या पलिकडे जाणारा हा सेल्फी पाहताना स्वत:मध्ये डोकावण्याची पुरेपूर संधी देतो असेच म्हणावं लागेल. फक्त त्याला प्रचलित चौकटीतून पाहता येणार नाही.

‘हायवे, एक सेल्फी आरपार’
विनय गानू निर्मित आणि आरभाट कलाकृती व खरपूस फिल्म्स कृत
गीत –  वैभव जोशी
संगीतकार – अमित त्रिवेदी
पाश्र्वसंगीत – मंगेश धाकडे
संकलन – परेश कामदार
कला दिग्दर्शन – प्रशांत बिडकर
डीओपी – सुधाकर रेड्डी
कलाकार – गिरीश कुलकर्णी, रेणुका शहाणे, सुनील बर्वे, मुक्ता बर्वे, हुमा कुरेशी, टिस्का चोप्रा, सतीश आळेकर, किशोर कदम, छाया कदम, नागराज मंजुळे, नंदकिशोर चौघुले, विद्याधर जोशी, मयुर खांडगे, श्रीकांत यादव, उमेश जगताप, शुभम, शकुंतला नगरकर, पूर्णानंद वांदेकर, निपुण धर्माधिकारी, देवेंद्र गायकवाड, सविता प्रभुणे, मकरंद सप्तर्षी, धीरेश जोशी, ओम भूतकर, पूर्वा पवार, शिवकांता औरंगाबादकर, शशांक शेंडे, शिल्पा अनासपुरे, जयंत गाडेकर, आदित्य कुलकर्णी, उर्मिला निंबाळकर, भूषण मंजुळे, शंकर डोंगरे, सहर्ष शुक्ला, समीर भाटे आणि वृषाली कुलकर्णी