माणसांप्रमाणेच वस्तू आणि वास्तूलाही प्राक्तन असते का? तसे नसते तर ‘कटी सार्क’ला जे मिळाले ते ब्रिटनमध्येच तयार झालेल्या आपल्या ‘विक्रांत’च्या नशिबी का नव्हते?

आय.एन. एस. विक्रांत ही युद्धनौका लिलावात काढण्यासंबंधीचा वाद संपून आता ती निकालात काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्याची मागणी फेटाळून लावण्यात आली. देखभालीचा खर्च परवडत नाही म्हणून भारतीय नौदलाच्या गौरवास्पद कामगिरीची साक्षीदार असलेली एक युद्धनौका भंगारात निघते याचं वाईट वाटलं आणि या तुलनेत मला ग्रीनविच, लंडन, इथे जतन केलेली ‘कटी सार्क’ ही त्यांची नौका आठवली.
‘विक्रांत’ ही युद्धनौका होती तर ‘कटी सार्क’ ही चहाच्या व्यापारासाठी खास बांधून घेतलेली नौका होती. त्यामुळेच, ‘विक्रांत’च्या निमित्ताने ‘कटी सार्क’बद्दल मला लिहावेसे वाटण्याचे कारण या दोन नौकांमध्ये काही साम्य आहे हे नसून, दोन देशांच्या आपापल्या देशातील वैभवशाली गोष्टींकडे बघण्याच्या दृष्टिकोनातील विरोधाभास हे आहे.
लंडनच्या प्रेक्षणीयस्थळातील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे ‘ग्रीनविच’. इथे ट्रेन किंवा बस, टॅक्सी, क्लिपर (बोट) कोणत्याही मार्गाने गेले तरी ‘कटी सार्क’ जहाज हा पहिला टप्पा असतो आणि मोठय़ा अभिमानाने ‘कटी सार्क’ पर्यटकांना दाखवले जाते. किंबहुना हे भव्य, दिमाखदार जहाज आपले लक्ष वेधून घेतेच. इतक्या पुरातन जहाजाचा आतमध्ये केलेला जुन्या, नव्याचा मेळ घालणारा कल्पक कायापालट पर्यटकांना स्तिमित करून टाकतो. या जहाजाला ‘टी क्लिपर’ असेही संबोधले जाते.
lp39‘कटी सार्क’ हे ब्रिटिश जहाज १८६९ मध्ये, जॉन विल्स यांनी बांधून घेतले. चीनमधून आयात केलेला, त्या त्या सीझनचा पहिला ‘चहा’ सर्वप्रथम बंदरात आणणाऱ्या जहाजाला त्या काळात घसघशीत बक्षीस (बोनस) दिले जात असे. त्यामुळे व्यापाराच्या दृष्टीने जहाज अत्यंत वेगवान असावे यावर जॉन विल्स यांचा भर होता. अशा रीतीने सर्वात वेगवान असे हे जहाज १८७० ते १८७७ या काळात चीनमधून युरोपकडे चहाची आयात करण्यासाठी वापरण्यात आले. त्यानंतरच्या काळात ते इतर व्यापारासाठी उपयोगात आणले गेले. मात्र या व्यापारी जहाजाला खरे महत्त्व प्राप्त झाले, जेव्हा नौदलाचे एक निवृत्त कप्तान विलफर्ड डोमन यांनी ते विकत घेतले आणि प्रशिक्षणासाठी ते उपयोगात आणले. या काळात ‘कटी सार्क’ने जगातील जवळजवळ प्रत्येक बंदराला भेट दिली. कधी खवळलेला समुद्र आणि प्रतिकूल हवामानातही या जहाजाने सफरी केल्या. जगातील सर्वात वेगवान, देखण्या असलेल्या मोजक्या जहाजांपैकी एक असलेल्या या जहाजाच्या कामगिरीचा त्या देशाला सार्थ अभिमान वाटला आणि त्या सोनेरी दिवसांची आठवण म्हणून १९५४ मध्ये ‘कटी सार्क’ ही नौका ग्रीनविच येथील डॉकयार्डमध्ये आणण्यात आली आणि लोकांना बघण्यासाठी ठेवण्यात आली.
२००७ मध्ये या जहाजाचे आगीने नुकसान झाले. परंतु त्या वेळीही त्याची योग्य दुरुस्ती, आवश्यक पुनर्बाधणी करून २०१२ साठी ते लोकांसाठी खुले करण्यात आले. २०१४ मध्येही किरकोळ आगीमुळे हे जहाज पूर्वपदावर येण्यासाठी काम करून घ्यावे लागले.
हे सर्व लिहिण्याचा प्रपंच ज्यासाठी केला ती नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी की जेव्हा या जहाजाची दुरुस्ती, पुनर्बाधणी करण्यासाठी आर्किटेक्ट्स आणि इंजिनीअर्सनी तयार केलेले कल्पक आराखडे अमलात आणण्यासाठी काम सुरू केले तेव्हा, म्हणजे २००६ साली या कामासाठी अंदाजे खर्च २५ दशलक्ष पौंड इतका उभा करणे जरुरीचे होते. त्या वेळी येथील ‘हेरिटेज लॉटरी फण्ड’ यांनी ११.७५ दशलक्ष पौंड इतकी भरीव रक्कम ग्राण्ट म्हणून दिली. तर ऑस्कर फिल्म निर्माता, जेरी ब्रुखमेर यांनी हा निधी उभारण्यासाठी स्वत:कडच्या संग्रहित फोटोंचे एक प्रदर्शन, लंडनमध्ये २००७ साली आयोजित केले व त्यातून मिळालेली भरघोस रक्कम हे ऐतिहासिक जहाज जतन करण्याच्या कामाला दिली. २००८ मध्ये ‘हेरिटेज लॉटरी फण्ड’ने या कामासाठी जरुरी असलेले आणखी १० दशलक्ष पौंड ‘कटी सार्क ट्रस्ट’ला दिले. ‘द डेली टेलिग्राफ’ यांचा २०१० मधील या संदर्भातील एक बातमी सांगते की सुरुवातीला २५ दशलक्ष पौंड असा अंदाज असलेला जहाज पुनर्बाधणी प्रकल्पाचा खर्च जवळजवळ ४६ दशलक्ष पौंडपर्यंत गेला. हा निधी उभारण्यात ‘हेरिटेज लॉटरी फण्ड’च्या व्यतिरिक्त समाजातील दानशूर संस्था आणि व्यक्तींचा सहभाग महत्त्वाचा होता. अशा रीतीने या देशाने, युरोपात दर मोसमात सगळ्यांच्या आधी म्हणजेच सगळ्यात वेगाने चहा आणणारे म्हणून ओळखले जाणारे हे व्यापारी जहाज जिद्दीने जतन केले आणि संपूर्ण जगातील पर्यटकांचे आकर्षण ठरावे अशा डौलात परत उभे केले गेले.
आता हे जहाज म्हणजे पर्यटकांसाठी एक भव्य, प्रेक्षणीय असे वस्तुसंग्रहालय आहे. तिकीट काढून ‘कटी सार्क’च्या आत प्रवेश केलात की तेथील फलक (बोर्ड्स), व्हिडीओ शोज, पत्रके (ब्रोशर्स) आणि तत्पर, हसतमुख कर्मचारीवर्ग तुमच्यापुढे ‘कटी सार्क’चा हा इतिहास जणू परत जिवंत करतात. संपूर्ण जहाज बघण्यासाठी साधारण दीड-दोन तास लागतात. जहाजाची जुनी शान टिकवण्याच्या बरोबरच अत्याधुनिक सोयी-सुविधांचा सुंदर समन्वय इथे साधला गेला आहे. जहाजाचे खूपसे मूळ भागही काळजीपूर्वक जतन केले आहेत. ‘कटी सार्क’पर्यंतचा क्लिपरने केलेला प्रवास, जहाजाची आतील रचना, जुने अवशेष याचे वर्णन हा तर एक स्वतंत्र लेख होईल. कारण तो एक खास अनुभव होता.
भारताचे पहिले विमानवाहू जहाज आज टप्प्याटप्प्याने निकालात निघत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचत असताना, राहून राहून दिमाखात उभे असलेले, (खरे तर दिमाखात उभे केलेले म्हणणे बरोबर ठरेल) ‘कटी सार्क’ डोळ्यांसमोर उभे राहते.
सगळ्याच प्रश्नांना उत्तरे नसतात, हे मान्य करूनही माझे भारतीय मन मला विचारते की, व्यक्तीप्रमाणेच वास्तू आणि वस्तूलाही प्राक्तन असते का? आणि आपल्या इतिहासाचे, वास्तूंचे, वस्तूंचे मोल ओळखण्याचे, त्याचा अभिमान बाळगण्याचे शिक्षणही आपण दुसऱ्या देशाकडूनच घ्यायचे का?

‘विक्रांत’ मात्र दुर्दैवी
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश रॉयल नेव्हीने ‘हक्र्युलस’ नावाने बांधायला घेतलेल्या जहाजबांधणीचे काम महायुद्ध संपल्यानंतर तसेच सोडून देण्यात आले. असे अपूर्ण बांधकाम असलेले जहाज भारताने १९५७ मध्ये त्यांच्याकडून विकत घेतले आणि त्याचे बांधकाम १९६१ मध्ये पूर्ण करून घेतले. त्यानंतर, ४ मार्च, १९६१ रोजी हे जहाज, ‘बेलफास्ट’ उत्तर आर्यलड येथे असताना, यू.के.मधील तेव्हाच्या उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांनी ‘विक्रांत’ या नावाने हे जहाज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करून घेतले. भारतीय नौदलाचे हे पहिले विमानवाहू जहाज!
पुढे, १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धात या युद्धनौकेने महत्त्वाची कामगिरी बजावली. पाकिस्तानी नौदलाने ‘विक्रांत’ लक्ष्य करण्याच्या उद्देशाने ‘गाझी’ ही युद्धनौका पाठवली. परंतु, ही पाकिस्तानी नौका विशाखापट्टणम येथेच बुडाली. आय.एन.एस. रजपूत यांनी प्रतिकारासाठी गाझीवर केलेले हल्ले हेच त्यामागचे कारण असू शकते, असे सांगितले जाते आणि त्यामुळेच विक्रांतवरील दोन बहादूरांना महावीर चक्र आणि बारा वीरांना वीरचक्र देऊ न गौरवण्यात आले. जानेवारी १९९७ मध्ये ही युद्धनौका भारतीय नौदलातून सेवानिवृत्त झाली. त्यानंतर ती नेव्हल डॉकयार्ड, कुलाबा इथे ठेवण्यात आली. परंतु, कालौघात या युद्धनौकेच्या देखभालीसाठी येणारा खर्च हा ती युद्धनौका निकालात काढण्याचे कारण ठरावा, हे सत्य दुर्दैवीच म्हणावे लागेल.